बारामती ! पंचक्रोशी प्रकाशन आयोजित काव्य संमेलन बारामती येथे संपन्न.

Uncategorized

प्रतिनिधी – फिरोज भालदार

भाग्यलक्ष्मी फाउंडेशन चे अध्यक्ष सागर वायाळ तसेच ज्येष्ठ साहित्यिक कवी शांतीलाल ननवरे यांच्या वाढदिवसानिमित्त १ जून रोजी ज्येष्ठ नागरिक संघ बारामती या ठिकाणी काव्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून मुख्याध्यापिका सुजाता शिंदे यांचा “भलावण” या कवितासंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामीण साहित्यिक मा. बबन पोतदार तर अध्यक्ष म्हणून डॉ .नितीन नाळे ,स्वागत अध्यक्ष म्हणून निसर्ग कवी लक्ष्मण शिंदे व महाराष्ट्र साहित्य केसरी संजयजी जाधव उपस्थित होते.

दिप प्रज्वलाना नंतर कवी संमेलनाला सुरुवात झाली. स्वागताध्यक्ष म्हणून बोलताना लक्ष्मण शिंदे म्हणाले, निसर्गाने आपल्याला भरभरून दिले आहे त्याचे आपण जतन केले पाहिजे. आपल्या काव्यातून त्यांनी निसर्गाचे महत्त्व पटवून दिले. तसेच मोबाईलचा अतिरेक वापर झाल्याने मुलांचे बालपण तर हरवत नाही ना? याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. तर प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना मा. बबन पोतदार म्हणाले, लोकांशी संवाद साधल्याने आपल्याला कथेचे बीज सापडते. त्यासाठी लहान मुलासारखी चौकस बुद्धी साहित्यिकाकडे हवी. आपले मन आनंदी असेल तर शरीरही सुदृढ राहते. संजयजी जाधव यांनी आपले प्रशासनातील अनुभव सांगितले. साहित्य निर्मिती सोपी असली तरी त्याचं प्रकाशन व ते लोकापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. कविता संग्रहातील एखादी कविता लोकांना भावते तेव्हा ते संग्रह विकत घेतात. तर शांतीलाल ननवरे यांनी “भलावण” या पुस्तकातील काही कविता ऐकवल्या.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. नितीन नाळे आपल्या अध्यक्षीय भाषणात श्रोत्यांना संबोधित करताना म्हणाले, हल्ली माणसां माणसातील संवाद कमी होत चालला आहे. कवी संमेलना सारख्या कार्यक्रमातून बहिणीला भाऊ व भावाला बहीण मिळते. ही नात्यांची झालर जोडणं महत्त्वाचं आहे. माणसाचं जीवन हे धावपळीचे झालं आहे.त्याला कुठेतरी स्थिरता आली पाहिजे. स्थिरता आणणं हे आपल्या हातात आहे. आपण स्थिरता आणली तरच काव्याला बहर येतो. आईच्या उदरातून जन्म घेतल्यानंतर आपली नाळ ज्या मातीशी जोडली जाते तीही आपली आईच आहे. ती आपले भरण पोषण करते ,आपण सुदृढ होतो, पण लक्षात घ्या आपले विचार मांडण्याआधी तुम्ही दुसऱ्याचे विचार ऐकायला पाहिजेत अन्यथा तुम्ही मनाने विक आहात. हल्ली शिक्षक व साहित्यिक हे समाजाला तणाव मुक्त ठेवण्याचे काम करताना दिसतात. त्यातूनच सुजाता शिंदे सारख्या कवयित्री निसर्गाचे गुणगान करणारा “भलावण” सारख्या कवितासंग्रहाची निर्मिती करतात काळे यांनी ‘भलावण’ कवितासंग्रहाला शुभेच्छा दिल्या.

डॉ.नितीन नाळे सरांनी वीस वर्षांपूर्वी “पर्यावरण फटका” नावाची कविता लिहिली होती त्याची दखल खासदार अमोल कोल्हे यांनी घेतली. ती आज सत्यात उतरताना दिसते. त्यासाठी त्यांना डॉक्टर ही पदवी मिळाली. यावरून कवी हा नुसता कल्पना करत नाही तर त्याच्याकडे दूरदृष्टी असते हे यावरून सिद्ध होते. या कवी संमेलनासाठी फलटण, बारामती, इंदापूर या भागातून अनेक कवी, कवयित्री उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन बाळासाहेब कर्चे यांनी केले तर सूत्रसंचालन हिंदवी प्रभुणे व राहूल शिंदे यांनी केले.