प्रतिनिधी.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे प्रसिद्ध प्रमुख भरत निगडे यांना त्यांच्या पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानासाठी ‘संतोष पवार आदर्श प्रसिद्ध प्रमुख पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. मुंबई प्रेस क्लबच्या कार्यालयात पार पडलेल्या या भव्य सोहळ्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते निगडे यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ देऊन गौरवण्यात आले.
भरत निगडे यांनी गेल्या १५ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सातत्याने समाजोपयोगी आणि मुद्देसूद कामगिरी केली आहे. त्यांनी सामाजिक प्रश्नांची दखल घेतली असून, त्यातून अनेक समस्यांकडे शासन आणि जनतेचे लक्ष वेधले. त्यांचे कार्य केवळ पत्रकारितापुरते मर्यादित नसून, ते पुरंदर तालुका पत्रकार संघाचे सदस्य म्हणूनही सक्रिय आहेत. अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचे सहप्रसिद्धी प्रमुख म्हणून भरीव कामगिरी करत आहेत. राज्यभरातील पत्रकारांच्या होणाऱ्या उपक्रमांची दखल घेत त्यांचे वार्तांकन करतात.
या कार्यक्रमाला डॉ. नरेंद्र जाधव (ज्येष्ठ विचारवंत आणि माजी कुलगुरु) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस. एम. देशमुख (मुख्य विश्वस्त, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद) होते. परिषद अध्यक्ष मिलिंद आष्टीकर, विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, शिवराज काटकर, प्रा. सुरेश नाईकवडे, कोषाध्यक्ष मन्सूर भाई शेख, डिजिटल मीडिया अध्यक्ष अनिल वाघमारे, शोभा जयपूरकर आणि मुंबई पत्रकार परिषदेचे अध्यक्ष राजा अदाटे व विविध पदाधिकारी यांच्यासह पत्रकार आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सोहळ्यात इतर मान्यवरांचाही गौरव करण्यात आला. मधुकर भावे यांना ‘बाळशास्त्री जांभेकर जीवन गौरव पुरस्कार’, ज्येष्ठ नाट्यकर्मी भरत जाधव यांना विशेष सन्मान, तर महेश म्हात्रे यांना ‘आचार्य अत्रे स्मृती संपादक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. याशिवाय विविध पत्रकारिता क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी अमय तिरोडकर, अभिजित कारंडे, पांडुरंग पाटील, सर्वोत्तम गावस्कर, दिनेश केळुसकर, श्रीमती सीमा मराठे, बाळासाहेब पाटील आणि श्रीमती शर्मिला कलगुटकर यांचाही सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन विशाल परदेशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. सुरेश नाईकवडे यांनी केले.