बारामतीत अनधिकृत बॅनर, फ्लेक्सला आळा; नगरपरिषदेचा ठराव जाहीर

Uncategorized

प्रतिनिधी.

बारामती : शहरातील वाढत्या बॅनर, फ्लेक्स व अनधिकृत जाहिरातींमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होणे, वृक्ष लागवडीचे व स्ट्रीट फर्निचरचे नुकसान होणे तसेच शहराचे विद्रुपीकरण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बारामती नगरपरिषदेकडून कडक पाऊले उचलण्यात आली आहेत.

महाराष्ट्र शासन निर्णय क्र. पीएमसी-३०१०/ प्र.क्र. ३९४ (भाग-२)/नवि-२२ दि.२२ जून २०२३ नुसार “आकाश-चिन्हे व जाहिरात प्रदर्शित करण्याचे नियमन व नियंत्रण मार्गदर्शक तत्वे २०२३” प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानुसार प्रशासकीय ठराव क्र. ३४६ दि.१९ ऑगस्ट २०२५ रोजी मंजूर करून बारामती नगरपरिषद हद्दीतील सर्वत्र बॅनर, फ्लेक्स, जाहिराती व स्कायसाईन लावण्यास संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे.

नगरपरिषदेच्या निवेदनानुसार, येथून पुढे कोणतेही बॅनर, फ्लेक्स, जाहिराती अथवा आकाशचिन्हे विनापरवानगी लावल्यास ते तात्काळ जप्त केले जाणार असून संबंधित व्यक्ती, संस्था, तसेच बॅनर लावण्यात सहभागी असणाऱ्या मंडप कॉन्ट्रॅक्टरवर सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण कायदा, १९९५ व मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग या अनुषंगाने गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले असून, “अनधिकृत बॅनर लावून शहराचे सौंदर्य विद्रुप करू नये. शहर स्वच्छ, सुंदर, हरित व अपघातमुक्त ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे,” असे आवाहन करण्यात आले आहे.