प्रतिनिधी.
सोमेश्वर नगर : भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सोमेश्वर नगर येथील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (यु.आय.डी. – बी०२१) विभागाच्या वतीने दिनांक २३ ऑगस्ट २०२५ रोजी ‘विभाजन विभिषिका स्मरण दिन’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे येथील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. पोपट शिंदे यांचे ‘विभाजन विभिषिका स्मरण’ या विषयावर सविस्तर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्रा. डॉ. शिंदे यांनी १९४७ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान फाळणीच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर प्रकाश टाकत सांगितले की, या फाळणीत सुमारे १.५ कोटी लोकांचे स्थलांतर झाले आणि लाखो निरपराध नागरिकांचे बळी गेले. ही फाळणी धर्माच्या आधारावर झाली होती. १९३० मध्ये जिनांनी मांडलेला द्वि-राष्ट्रवादाचा सिद्धांत, इंग्रजांचे फोडा आणि राज्य करा धोरण, आणि नंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने फाळणीला दिलेली संमती, या सगळ्या घटनांचा त्यांनी चिकित्सक आढावा घेतला.
महात्मा गांधींनी फाळणीला नेहमीच विरोध केला होता, याची आठवण करून देताना डॉ. शिंदे म्हणाले की, “मी या फाळणीचा आनंद साजरा करू शकत नाही,” असे गांधीजींनी स्पष्टपणे सांगितले होते. विविधतेत एकता जपणारा आणि सहिष्णुतेचे दर्शन घडवणारा भारत या संकटातून कसा सावरला, हेही त्यांनी उदाहरणासहित स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे होते. त्यांनी फाळणीची पार्श्वभूमी, तिचा घटनाक्रम व परिणाम यावर सखोल भाष्य केले.
कार्यक्रमात प्रा. डॉ. जवाहर चौधरी, प्रा. डॉ. जगन्नाथ साळवे, प्रा. डॉ. गेनू दरेकर, प्रा. अच्युत शिंदे, प्रा. डॉ. बाळासाहेब मरगजे, प्रा. डॉ. निलेश आढाव, प्रा. डॉ. राहुल खरात, प्रा. प्रविण ताटे देशमुख, प्रा. डॉ. संजू जाधव आदी मान्यवर प्राध्यापक, महाविद्यालयातील सर्व शिक्षकवृंद तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. आदिनाथ लोंढे (कार्यक्रम अधिकारी, रा.से.यो.) यांनी केले. अतिथी परिचय प्रा. डॉ. जया कदम यांनी करून दिला, तर प्रा. डॉ. नारायण राजूरवार यांनी आभार प्रदर्शन केले.