प्रतिनिधी
वडगाव निंबाळकर : अवैधरित्या वेश्या व्यवसायाकरिता जबरदस्तीने नेत असलेल्या दोन महिलांची सुटका करून पोलिसांनी दोन सराईत आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई दिनांक १५ सप्टेंबर रोजी करंजे पूल बसस्टॉप परिसरात करण्यात आली.
पोलिस पेट्रोलिंगदरम्यान काळ्या काचा असलेली लाल रंगाची संशयित गाडी दिसल्याने नाकाबंदी करून तपासणी करण्यात आली. त्यावेळी गाडीत दोन पुरुष आणि दोन महिला आढळल्या. महिला पोलिसांच्या उपस्थितीत चौकशी केल्यानंतर पीडित महिलांना पैशाचे आमिष दाखवून हडपसर, पुणे येथून लोणंद येथे आणून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जात असल्याचे स्पष्ट झाले. आरोपी पुन्हा या महिलांना नीरा-बारामती रोडने नेत असताना कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी सुयोग हिंदुराव खताळ आणि प्रीतम आप्पासाहेब घुले (दोघेही रा. कापडगाव, लोणंद, ता. फलटण, जि. सातारा) यांना अटक करण्यात आली असून त्यांची स्विफ्ट कार (MH 11 MD 8055) जप्त करण्यात आली आहे.
पीडित महिलांच्या फिर्यादीवरून आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम 140(3), 143(3), 144(2), 3(5) तसेच महिला व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम कलम 4 आणि 5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तपासातून आणखी मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक विलास नाळे, सहाय्यक निरीक्षक नागनाथ पाटील, उपनिरीक्षक राहुल साबळे आणि त्यांच्या पथकाने केली.
करंजे पूल पोलीस दूर क्षेत्र मधील पोलिसांच्या बद्दल जनसामान्यांमध्ये विश्वासार्हता निर्माण झाली आहे.केलेल्या कारवाईचे नागरिकांमधून कौतुक होत आहे.