बारामती! बारामतीत विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारकाला भव्य तोरण (कमान) उभारणीची मागणी.

Uncategorized

 प्रतिनिधी –

बारामती शहरातील विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा स्मारकाला प्रवेशद्वारावर त्यांच्या कार्य, विचार व वारशाचे प्रतीक ठरेल अशी सांची स्तूप शैलीतील भव्य सुवर्णकमान (तोरण) उभारण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन नगर परिषद बारामतीचे मुख्याधिकारी यांना अधीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्फत आज सादर करण्यात आले. निवेदन देताना वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष मंगलदास निकाळजे, सामाजिक कार्यकर्ते अनिकेत मोहिते व अजिज सय्यद उपस्थित होते.

निवेदनात नमूद करण्यात आले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा संदेश बारामतीसह संपूर्ण देशाच्या जनमानसात प्रेरणादायी ठरला आहे. त्यांचे स्मारक हे केवळ एक पुतळा नसून दलित, वंचित, शोषित समाजाच्या आत्मसन्मानाचे प्रतीक आहे. त्यामुळे या स्मारकाला शोभेल अशी दिमाखदार व ऐतिहासिक वारसा दर्शविणारी कमान उभारणे गरजेचे आहे.

अशी कमान उभारल्यास..
1. स्मारकाची ऐतिहासिक व सांस्कृतिक उंची वाढेल.
2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे प्रतीकात्मक दर्शन घडेल.
3. बारामती शहराच्या सामाजिक व सांस्कृतिक वैभवात भर पडेल.
4. येणाऱ्या पिढ्यांना अभिमानाची जाणीव व प्रेरणा मिळेल.
वंचित बहुजन युवा आघाडीने नगर परिषदेने या मागणीवर सकारात्मक निर्णय घेऊन स्मारकाला शोभेल असे तोरण उभारण्याचे तातडीने पाऊल उचलावे, अशी आग्रही मागणी केली आहे.