संपादक मधुकर बनसोडे.
बारामती : लोकांच्या अडचणी सोडविण्याऐवजी ग्रामपंचायतीचे कार्यालयच जल्लोषाचे ठिकाण बनले आहे, असा संतापजनक प्रकार जळगाव सुपे (ता. बारामती) येथे घडला आहे. महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम संपल्यानंतर कर्मचाऱ्यांचा वाढदिवस कार्यालयीन वेळेत केक कापून व टाळ्यांच्या गजरात साजरा करण्यात आला.
या प्रकाराविरोधात बारामतीचे रहिवासी अमित बगाडे यांनी आपले सरकार पोर्टल वर थेट तक्रार दाखल करत, “कार्यालय हे जनतेच्या सेवेचं मंदिर आहे, ते पार्टी हॉल नाही” असा सवाल उपस्थित केला आहे. त्यांनी संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
ग्रामपंचायतीने वाढदिवस साजरा केल्याचे मान्य केले असले, तरी बगाडे यांना दिलेल्या उत्तरावर समाधान झाले नाही. त्यामुळे त्यांनी तक्रार Escalated Tab द्वारे वरच्या अधिकाऱ्यांकडे नेली. पुढे अशा प्रकारांना आळा बसावा म्हणून सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांना स्पष्ट व कठोर आदेश देण्यात यावेत, अशी त्यांची ठाम भूमिका आहे.
दरम्यान, या प्रकरणी विभागीय कार्यालयाकडून चौकशी सुरू असून, नियमोचित कारवाई होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र जनतेत प्रश्न उपस्थित होतोय की — “कार्यालयीन वेळेत सरकारी कर्मचाऱ्यांचा वाढदिवस साजरा करण्यास परवानगी कोण देतो?”