प्रतिनिधी.
जळगाव शहराजवळील मेहरूण परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेत, स्मशानभूमीतून वृद्ध महिलेच्या अस्थी चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मृत महिलेच्या कुटुंबीयांनी भावनिक आवाहन करत म्हटले आहे — “आम्हाला सोने नको, फक्त आईच्या अस्थी परत करा.”
गायत्रीनगर येथील छबाबाई काशिनाथ पाटील (वय. ७५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले होते. त्यांच्या इच्छेनुसार अंत्यसंस्कारावेळी अंगावरील सोन्याचे दागिने न काढता अंतिम संस्कार करण्यात आले. कुटुंबीयांनी दुसऱ्या दिवशी अस्थी संकलनासाठी स्मशानभूमीत गेल्यावर, त्यांनी पाहिले की अस्थींच्या काही भागांचा, विशेषतः डोके, हात आणि पायाच्या अवशेषांचा, ठावठिकाणा नव्हता.
या अमानवी घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कुटुंबीयांनी सांगितले की, “आईच्या अस्थी आमच्यासाठी सोन्यापेक्षा मौल्यवान आहेत. आम्हाला कोणताही दागिना नको, फक्त त्या अस्थी परत द्या.”
सध्या पोलिसांकडे या घटनेबाबत प्राथमिक माहिती देण्यात आली असून तपास सुरु आहे. घटनेच्या रात्री स्मशानभूमी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची शक्यता आहे. स्थानिक नागरिकांनीही सुरक्षेच्या दृष्टीने स्मशानभूमीत प्रकाशयोजना आणि गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.
या प्रकाराने केवळ पाटील कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण समाजात संतापाची लाट उसळली आहे. मृत व्यक्तीच्या अस्थींवर हक्क सांगणारी आणि त्यांची चोरी करणारी मानसिकता ही मानवी संवेदनशीलतेचा पराभव असल्याचे सामाजिक संस्थांनी म्हटले आहे.
“आम्हाला सोने नको, फक्त आईच्या अस्थी परत करा” — पाटील कुटुंब