सोमेश्वर दुकान लाईनच्या व्यावसायिकांचा आक्रोश : “दादा, आमचा प्रपंच वाचवा!

Uncategorized

संपादक : मधुकर बनसोडे
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या परिसरातील दुकान लाईनमधील व्यावसायिकांचा आज तीव्र आक्रोश उसळला. गेली पन्नास ते साठ वर्षे कारखान्याच्या जागेत व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या या व्यावसायिकांवर अचानक संकट कोसळले आहे.

कारखाना प्रशासनाकडून काही दिवसांपूर्वी दुकान लाईन परिसरात चैनल उभे करण्यात आले. आज त्या ठिकाणी अडथळा (पत्रा) उभारण्याचे काम सुरू होणार असल्याची माहिती मिळताच स्थानिक व्यावसायिकांनी विरोधाचा पवित्रा घेतला.

स्थानिक महिलांनी भावनिक आवाहन करत म्हटले, “दादा अजित पवार, आम्ही तुमच्या लाडक्या बहिणी आहोत. आमचा प्रपंच वाचवा. आमच्या दुकानासमोर अडथळा उभारल्यास ग्राहक येण्यासाठी जागाच उरणार नाही.”

व्यावसायिकांनी सांगितले की, “आम्ही गेल्या अनेक दशकांपासून या ठिकाणी व्यवसाय करीत आहोत. कारखाना प्रशासन आमची गळचेपी करत आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर आमचा शिमगा होऊ देऊ नका.”

घटनेच्या पार्श्वभूमीवर सोमेश्वर कारखान्याच्या सुरक्षा विभागाकडून सुमारे २५ ते ३० सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले होते. तसेच पोलीस प्रशासनाकडूनही कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

या घटनेमुळे व्यावसायिक आणि कारखाना प्रशासन यांच्यात तणाव निर्माण झाला असून, या वादावर कोणता तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.