सोमेश्वर यंदाही राखणार उच्चांकी ऊस दराची परंपरा — श्री. पुरुषोत्तम जगताप

माझा जिल्हा

प्रतिनिधी

राज्याचे उपमुख्यमंत्री व सोमेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक आदरणीय मा. ना. श्री. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोमेश्वर कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरु आहे. गाळप हंगाम सन २०२५-२०२६ साठी कारखान्याची एफ.आर.पी. प्रति मेट्रिक टन रु. ३,२८५/- इतकी निश्चित झाली असून, कारखान्याने कायमच एफ.आर.पी. पेक्षा जादा ऊस दर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. या हंगामातही उच्चांकी ऊस दर देण्याचा निर्धार सोमेश्वर कारखान्याने केला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन श्री. पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.

जगताप म्हणाले की, “कारखाना कार्यक्षेत्रामध्ये पुरेशा प्रमाणात ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा उपलब्ध असून, ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचे पैसे देऊ नयेत. जर कोणी पैशाची मागणी करत असेल तर तत्काळ कारखान्याच्या शेतकी खात्याशी संपर्क साधावा. तसेच सभासदांनी ऊस जाळून तोडणी करण्यास संमती देऊ नये,” असे आवाहन त्यांनी केले.

ते पुढे म्हणाले की, “गाळप हंगाम २०२५-२०२६ साठी सभासद, शेअर्स मागणीदार व कार्यक्षेत्रातील बिगर सभासद यांना फेब्रुवारी २०२६ मध्ये गळीतास येणाऱ्या ऊसावर प्रति मेट्रिक टन रु. १००/-, मार्च २०२६ मध्ये रु. २००/- आणि एप्रिल २०२६ मध्ये रु. ३००/- इतके अनुदान देण्यात येणार आहे.”

श्री. जगताप यांनी शेतकऱ्यांना सल्ला दिला की ऊस लागवड करताना ५ फुट सरीमध्ये लागण करावी, जेणेकरून ऊस तोडणी मजुरांची टंचाई लक्षात घेता यंत्राद्वारे तोडणी करणे सुलभ होईल. पुढील गाळप हंगाम २०२६-२०२७ साठी, यंत्राद्वारे तोडणी केलेल्या ऊसास प्रति मेट्रिक टन रु. ५०/- अनुदान देण्यात येईल.

तसेच त्यांनी इशारा दिला की, “सभासद आणि बिगर सभासदांनी नोंदविलेला ऊस इतर कारखान्याला अथवा अन्यत्र देऊ नये. असे केल्यास कारखान्याने दिलेल्या सर्व सोयी-सवलती बंद केल्या जातील.”

शेवटी श्री. जगताप यांनी सर्व सभासद बांधवांना आवाहन केले की, “सोमेश्वर कारखान्याला निष्ठेने ऊस पुरवून कारखान्याची उच्चांकी दर देण्याची परंपरा कायम राखूया.”