प्रतिनिधी
वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यावर गंभीर मानसिक छळाचे आरोप; व्हॉट्सॲप स्टेटसमुळे घटनेची माहिती उघड.
पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेल्या यवत पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या त्रासाला कंटाळून बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पोलीस नाईक निखिल रणदिवे असे बेपत्ता झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून, त्यांनी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यावर मानसिक छळ केल्याचा आणि वारंवार त्रास दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. शुक्रवारी (दि. ५ डिसेंबर) दुपारपासून ते बेपत्ता असून, पोलीस दलात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस नाईक रणदिवे यांनी बेपत्ता होण्यापूर्वी आपल्या व्हॉट्सॲप स्टेट्सवर एक भावनिक संदेश टाकला होता. तसेच, त्यांनी एका चिठ्ठीद्वारे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख हे त्यांच्या त्रासाला जबाबदार असल्याचे स्पष्टपणे नमूद केले होते. रणदिवे यांनी देशमुख यांच्याकडून होणाऱ्या त्रासाचा तपशीलही या चिठ्ठीत लिहिला होता.
हा संदेश आणि चिठ्ठी व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठांनी तात्काळ दखल घेतली. रणदिवे यांचा शोध घेण्यासाठी तातडीने पथके तयार करण्यात आली आहेत.
बेपत्ता झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या चिठ्ठीनुसार, त्यांना कामाच्या ठिकाणी आणि वैयक्तिक आयुष्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडून वारंवार मानसिक त्रास दिला जात होता.
या गंभीर घटनेनंतर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. बेपत्ता पोलीस कर्मचाऱ्याचा तातडीने शोध घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची विभागीय चौकशी सुरू करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
या घटनेमुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणारे संभाव्य गैरवर्तन पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहे.
















