प्रतिनिधी.
रविवार दिनांक १२/४/२०२६ रोजी ज्येष्ठ नागरिक संघ बारामती येथे *माँ से बेटी सवाई* हा कार्यक्रम लीनेस क्लब तर्फे आयोजित केला होता.
विविध क्षेत्रात ज्या मुलींनी चांगले काम केले आहे अश्या मुलींच्या आई चा सन्मान करून मुली कश्या घडवाव्यात, त्यांना कसे संस्कार द्यावेत, चांगला समाज निर्माण करताना आईचे योगदान समाजापर्यंत पोहचावे व मुलीच्या पालकांना आपल्या घरात मुलगी जन्माला आली ही भाग्याची गोष्ट आहे, असा संदेश देण्याच्या हेतूने हा कार्यक्रम आयोजित केला होता.
स्त्रीभ्रूण हत्या थांबविणे, कायदेविषयक जनजागृती, कौटुंबिक समुपदेशन,महिला सबलीकरण, सक्षमीकरण या कार्यासाठी ॲड. सुप्रिया विशाल बर्गे गेली 18वर्ष सातत्याने काम करीत आहेत. त्यांच्या कार्याचा उपयोग समाजास होत आहे. या कामाची दखल घेऊन ऍड. सुप्रिया बर्गे यांच्या आई यांनी मुलगी सांभाळताना, वाढविताना शिक्षण देताना जे अथक परिश्रम घेतले त्यासाठी आई नंदा काकडे यांना ‘माँ से बेटी सवाई’ हा आदर्श माता पुरस्कार देण्यात आला. त्या गृहिणी असून अत्यंत खडतर आयुष्यात मुलांना चांगले संस्कार देण्यासाठी त्यांनी अतोनात कष्ट घेतले मुलीला उच्च शिक्षण दिले. सुशिक्षित बर्गे कुटुंबात तिचे लग्न करून दिल्याने मुलगी ॲड. सुप्रिया विशाल बर्गे यांच्या वकिली क्षेत्रातील कर्तृत्वास झळाळी मिळाली.
या कार्यक्रमात ॲड. सुप्रिया बर्गे यांनी मनोगत व्यक्त करताना “मुलींना शिक्षण देऊन स्वावलंबी बनवण्यासाठी प्रत्येक आईने पुढाकार घ्यावा” असा संदेश दिला.
ऍड. सुप्रिया बर्गे व त्यांच्या आई नंदा काकडे यांचा सत्कार सौ राधिका जाचक यांचे हस्ते शाल श्रीफळ, बुके , भेटवस्तू व सन्मानचिन्ह देऊन जेष्ठ नागरिक संघ बारामती इथे सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन मोनिका गांधी यांनी केले. प्रस्तावना सोनाली मुनोत यांनी सांगितली, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शुभांगी चौधर यांनी केले.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन शीतल यादव , रीनल शाह, मोनिका गांधी यांनी केले या कार्यक्रमात सीमा चव्हाण, विजया कदम, धनश्री भाभी, उज्वला शिंदे यांनी मार्गदर्शन केले.महिला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.












