प्रतिनिधी
विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील ८ वर्षांपासून चोरीच्या गुन्ह्यात पाहिजे असलेल्या आरोपीला खंडणी विरोधी पथक-०२ ने अटक केली आहे.
वरिष्ठांच्या आदेशानुसार खंडणी विरोधी पथक-०२ चे पथक विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार संजय आढारी व पोलीस अंमलदार शेखर खराडे यांना बातमीदारामार्फत गोपनीय माहिती प्राप्त झाली की, एक पाहिजे आरोपी शितोळे चौक, नवी सांगवी, पुणे येथे आला आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने शितोळे चौक येथे सापळा रचून संशयितास ताब्यात घेतले. त्यास नाव व पत्ता विचारला असता त्याने आपले नाव अक्षय उर्फ लिंग्या संजय भोसले, वय ३२ वर्षे, रा. शितोळे चौक, निशिगंधा अपार्टमेंट, नवी सांगवी, पुणे असे सांगितले.
त्याच्याबाबत विश्रांतवाडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती घेतली असता, तो विश्रांतवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक ५२/२०१८ या गुन्ह्यात मागील ८ वर्षांपासून पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.
सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी विश्रांतवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदर कामगिरी पोलीस निरीक्षक श्री. राम राजमाने, खंडणी विरोधी पथक-०२, गुन्हे शाखा, पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
