प्रतिनिधी.
१२६ नवयुगल जोडपी विवाहबंधनात २९ ऑक्टोबर २०२६ :- जिथे सद्गुरूंचा पावन आशीर्वाद, प्रेम आणि अध्यात्मिकतेचा सुंदर संगम असतो, तिथे प्रत्येक मंगलमय क्षण हा दिव्य अनुभूती बनतो. ७९ व्या निरंकारी संत समागमाच्या समारोपानंतर समालखा येथील पावन मैदानावर सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता रमित जी यांच्या दिव्य उपस्थितीत आयोजित करण्यात आलेला सामूहिक विवाह सोहळा याच अध्यात्मिक भावनेचे सुंदर प्रतीक ठरला. या सोहळ्यात १२६ नवविवाहित जोडपी विवाहबंधनात बांधली गेली आणि त्यांनी आपल्या नवजीवनाचा शुभारंभ केला. तसेच सद्गुरूंचा प्रेम, समर्पण आणि सुखमय वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद प्राप्त केला.
कार्यक्रमाचा शुभारंभ पारंपरिक जयमाला आणि निरंकारी सांझा-हाराने झाला. मिशनच्या प्रधान आदरणीय राजकुमारी जी तसेच इतर कार्यकारिणी सदस्यांनी सर्व नवविवाहित जोडप्यांना सांझा-हार घालून त्यांच्या सुखमय नवजीवनासाठी मंगलकामना केल्या. त्यानंतर हिंदी भाषेत भक्तिमय निरंकारी लावांचे गायन करण्यात आले. या लावांमध्ये विश्वास, सन्मान आणि समर्पणाने परिपूर्ण गृहस्थ जीवनाच्या सुंदर शिकवणींचा समावेश होता. कार्यक्रमाच्या शेवटी सद्गुरु माता जी आणि निरंकारी राजपिता जी यांनी नवविवाहित जोडप्यांवर पुष्पवृष्टी करून त्यांना सुख, शांती आणि आनंदमय जीवनाचा आशीर्वाद प्रदान केला.
सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज यांनी आपल्या आशीर्वचनांमध्ये नवविवाहित जोडप्यांना प्रेरणा देताना सांगितले की, सामूहिक विवाहाचा भाव केवळ एका आयोजनापुरता मर्यादित न राहता तो जीवन जगण्याची पद्धत बनला पाहिजे. पती-पत्नीने एकमेकांच्या जबाबदाऱ्या समान भावनेने स्वीकारून प्रेम, विश्वास आणि परस्पर समन्वयाने जीवनाचा प्रवास करावा.
जीवनातील प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाताना पती-पत्नीने एकमेकांचे दोन पंख बनून परस्परांना आधार द्यावा. एकमेकांच्या सामर्थ्याला प्रोत्साहन देत, अडचणींच्या काळात एकमेकांच्या पाठीशी उभे राहावे आणि आनंदाच्या क्षणी तो आनंदही एकत्रितपणे अनुभवावा, असा संदेश त्यांनी दिला.
सेवा, सुमिरन आणि सत्संगाच्या मार्गावरही पती-पत्नीने एकमेकांना सहकार्य करावे आणि आध्यात्मिक तसेच कौटुंबिक जीवनात पुढे जाण्यासाठी परस्परांना प्रेरणा द्यावी, असे सद्गुरु माता जी यांनी सांगितले.
विवाह हा केवळ दोन व्यक्तींमधील संबंध नसून प्रेम, आदर आणि समर्पणाने आयुष्यभर जपला जाणारा पवित्र बंध आहे. दोन्ही कुटुंबांमध्ये परस्पर सन्मान, प्रेम आणि आपुलकीची भावना वाढीस लागल्यास हा बंध आणखी दृढ होतो. एकमेकांच्या कमतरता सहजतेने स्वीकारणे, चुका झाल्यास क्षमा करणे आणि प्रत्येक परिस्थितीत नम्रतेची भावना कायम ठेवणे, हे सुखी वैवाहिक जीवनाचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत, असा संदेशही सद्गुरु माता जी यांनी दिला.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, सद्गुरु माताजींच्या परिवारातील एका सदस्याचा शुभविवाहदेखील याच सामूहिक साध्या विवाह सोहळ्यात संपन्न झाला.
संत निरंकारी मंडळाचे सचिव आदरणीय श्री. जोगिंदर सुखीजा जी यांनी माहिती देताना सांगितले की, समाज कल्याण विभागाच्या सहकार्याने आयोजित या विवाह सोहळ्यात सद्गुरु माताजींच्या सान्निध्यात भारतातील बिहार, चंदीगड, छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हिमाचल प्रदेश, हरियाणा, जम्मू-कश्मीर, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या विविध राज्यांमधून तसेच ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि कॅनडा येथून आलेल्या नवविवाहित जोडप्यांनी सहभाग घेतला.
विविध प्रदेश, भाषा आणि संस्कृतीतून आलेल्या या १२६ नवविवाहित जोडप्यांचे एकाच वेळी विवाहबंधनात बांधले जाणे हे एकत्व, समानता आणि वैश्विक बंधुभावाचे अनुपम उदाहरण ठरले. विविधतेमध्येही प्रेम आणि मानवतेचा समान धागा किती सुंदरपणे जोडला जाऊ शकतो, याचे दर्शन या सोहळ्यात घडले.
अशा प्रकारे हा दिव्य विवाह सोहळा साधेपणा, प्रेम आणि एकत्वाचे अनुपम प्रतीक ठरला. या सोहळ्याने हा संदेश दिला की, खरे नातेसंबंध हे विश्वास, समर्पण आणि मानवी मूल्यांच्या आधारावर अधिक दृढ होतात. निःसंशयपणे, सद्गुरूंच्या पावन आशीर्वादाने सुरू झालेली या नवविवाहित जोडप्यांची जीवनयात्रा प्रेम, आनंद आणि सुख-समृद्धीने परिपूर्ण होवो, हीच या मंगलमय सोहळ्याची सुंदर प्रेरणा ठरली.
