प्रतिनिधी
गोआ येथे नुकत्याच पार पडलेल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘ICN Goa Supershow’ या राष्ट्रीय पातळीवरील नॅचरल बॉडीबिल्डिंग स्पर्धेत वाणेवाडी (ता. बारामती) गावचे सुपुत्र आणि उदयोन्मुख ॲथलीट ऋषिकेश योगेश भोसले यांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्यांनी या स्पर्धेत उत्कृष्ट शरीरसौष्ठवाचे प्रदर्शन करत वेगवेगळ्या कॅटेगरीत १ रौप्य (Silver) आणि २ कांस्य (Bronze) पदके पटकावली असून, विजेतेपद मिळवून गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
‘आय.सी.एन.’ (ICN – I Compete Natural) ही संस्था जागतिक स्तरावर पूर्णपणे नैसर्गिक (Natural) पद्धतीने, म्हणजेच कोणत्याही प्रकारच्या ड्रग्स, स्टेरॉइड्स किंवा उत्तेजक द्रव्यांशिवाय बॉडीबिल्डिंग करणाऱ्या खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ओळखली जाते. ऋषिकेश भोसले यांनी संस्थेच्या अत्यंत कडक अशा सर्व नियमांचे आणि वैद्यकीय निकषांचे तंतोतंत पालन करून हे यश संपादन केले आहे. गेल्या अनेक वर्षांचे अफाट कष्ट, सातत्यपूर्ण व्यायाम आणि कठोर डाएटच्या जोरावर त्यांनी हा टप्पा गाठला आहे.
ऋषिकेश भोसले यांनी वेगवेगळ्या विभागांत मिळवलेल्या या घवघवीत यशामुळे संपूर्ण वाणेवाडी परिसरासह फिटनेस क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
