मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Friday, 30 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
ताज्या बातम्या

बारामती येथे वैद्यकीय महाविद्यालयात ‘व्हाईट कोट’ समारंभ उत्साहात संपन्न

mnewsmarathi 30 Oct 2026 1 मिनिट वाचन 4,873 वाचन

प्रतिनिधी.

बारामती, दि. २९ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, बारामती येथे प्रथम वर्षाच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी ‘व्हाईट कोट’ समारंभ उत्साहात संपन्न झाला. वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवासाची सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय व्यवसायातील जबाबदाऱ्या, नैतिक मूल्ये, रुग्णसेवेचे महत्त्व आणि मानवतावादी दृष्टिकोन यांची जाणीव करून देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. अंजली पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, वैद्यकीय शिक्षणात केवळ शैक्षणिक ज्ञान व तांत्रिक कौशल्ये महत्त्वाची नसून संवेदनशीलता, सहानुभूती आणि माणुसकीही तितकीच आवश्यक आहे. रुग्णांच्या वेदना समजून घेणे, त्यांच्याशी आदराने वागणे आणि त्यांच्या भावनांचा सन्मान करणे ही प्रत्येक डॉक्टरची मूलभूत जबाबदारी आहे.

‘व्हाईट कोट’ हा केवळ वैद्यकीय व्यवसायाचा पोशाख नसून रुग्णांप्रती असलेली बांधिलकी, प्रामाणिकपणा, सेवाभाव, शिस्त आणि नैतिक जबाबदारी यांचे प्रतीक आहे, असे अधिष्ठाता डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी करावा, गरीब व गरजू रुग्णांची सन्मानपूर्वक सेवा करावी आणि आयुष्यभर शिकण्याची वृत्ती जोपासावी, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी पालक-शिक्षक बैठकीत महाविद्यालयामध्ये रॅगिंगविरोधी उपाययोजना, रॅगिंग प्रतिबंधक नियम, विद्यार्थ्यांची सुरक्षितता, तक्रार नोंदविण्याची व्यवस्था तसेच महाविद्यालयातील सकारात्मक व सन्मानपूर्ण वातावरणाचे महत्त्व याबाबत पालकांना माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महाविद्यालय आणि पालक यांच्यात नियमित संवाद व समन्वय आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमास उपअधिष्ठाता (पदव्युत्तर विभाग) डॉ. नकाते, वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमाप, कार्यक्रम समन्वयक डॉ. सुदके, महाविद्यालयातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, निवासी डॉक्टर, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

‘व्हाईट कोट’ परिधान करताना विद्यार्थ्यांनी रुग्णसेवा, मानवता, प्रामाणिकपणा आणि वैद्यकीय व्यवसायातील नैतिक मूल्ये जपण्याचा संकल्प केला. या समारंभामुळे विद्यार्थ्यांमध्ये रुग्णांप्रती सहानुभूती, सेवाभाव आणि व्यावसायिक जबाबदारीची भावना अधिक दृढ झाली.
याचवेळी डॉ. स्नेहा साठे व त्यांच्या टीमच्या वतीने पालक-शिक्षक संघटनेची बैठकही संपन्न झाली.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi