प्रतिनिधी
पुणे जिल्हा पुन्हा एकदा अल्पवयीन मुलांच्या वाढत्या गुन्हेगारीमुळे हादरून गेला आहे.खेड तालुक्यातील तिन्हेवाडी येथून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. गाडीला कट मारल्याच्या किरकोळ वादातून एका युवकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला असून, यात शिवम करमारे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी तप्तरता दाखवत तीन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शिवम बाळासाहेब करमारे हा तरुण आपल्या दुचाकीवरून जात असताना, पूर्वमनुष्यावरून किंवा काही दिवसांपूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून तिघांनी त्याच्यावर अचानक कोयत्याने वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, शिवमची तीन बोटे जागीच तुटली आणि त्याचा एक हात कायमचा निकामी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
हल्ल्यात गंभीर आणि रक्तबंबाळ झालेल्या शिवमला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्याच्या शरीरावर तब्बल ७०० टाके घालावे लागले. आरोपींनी त्याच्या डोक्यावर आणि हातावर वार केले होते. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी आरडाओरडा केल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम राबवली आणि राक्षेवाडी येथून तिन्ही अल्पवयीन संशयितांना बेड्या ठोकल्या. या घटनेमुळे खेड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
