प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या चाकण-तळेगाव मार्गावरील खराबवाडी हद्दीत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका दुधाच्या टँकरला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.ही घटना आत्महत्या आहे की घातपात, याबाबत संशय व्यक्त केला जात असून पोलीस कसून तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चाकण-तळेगाव रस्त्यावरील नाफेडच्या मोकळ्या जागे समोर दुधाचा टँकर (क्रमांक: एम. एच. १४ डी. एम. ५४५८) रस्त्याच्या कडेला उभा होता. दरम्यान, रात्रीच्या सुमारास एका अनोळखी तरुणाने या टँकरच्या वर जाण्यासाठी असलेल्या लोखंडी शिडीला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेतल्याचे उघडकीस आले.
रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर परिसरात एकच गर्दी झालीया घटनेची माहिती तातडीने महाळुंगे दक्षिण एमआयडीसी पोलीस ठाण्याला देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह पुढील उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. मृत तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. त्याने हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, की यामागे काही घातपाताचा प्रकार आहे, या दोन्ही शक्यतांची पडताळणी करत पोलीस पुढील तपास करत आहेत..
