प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गुरव परिसरात रस्त्याच्या कडेला कचऱ्यात एका पोत्यामध्ये पुरुषाचे गुडघ्यापासून वेगळे केलेले दोन पाय आढळल्याने मोठी खळबळ उडाली होती.या धक्कादायक हत्याकांडाचा सांगवी पोलिसांनी अवघ्या काही तासांत उलगडा केला आहे.
विष्णू तानाजी कुंभार असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून, अनिल खाडे असं मृत व्यक्तीचं नाव आहे.रामकृष्ण मंगल कार्यालय ते काटेपुरम चौकादरम्यान रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्यात हा प्रकार उघडकीस आला. काल शुक्रवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या दरम्यान कृष्णा लोट आणि ओमकार काळे हे कचरा गोळा करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांना एका पोत्यावर रक्ताचे डाग दिसले. सुरुवातीला पोत्यात श्वानाचे पाय असल्याचा त्यांना संशय आला.
मात्र, पोते उघडून पाहिले असता त्यामध्ये मानवी पाय असल्याचं समोर आलं. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तपास सुरू केला असता ज्या पोत्यात मानवी पाय ठेवण्यात आले होते, त्यामध्येसिमकार्डचे कव्हर आढळले. या कव्हरवरील मोबाईल क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली.
या क्रमांकाच्या माध्यमातून पोलिसांना मृत अनिल खाडे याच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचता आले. त्यानंतर पोलिसांचा तपास आरोपी विष्णू कुंभार याच्यापर्यंत पोहोचला. पोलिसांनी विष्णू कुंभार याच्या घरी धाव घेतली असता घराला कुलूप असल्याचं दिसून आलं. आरोपी घराला कुलूप लावून फरार झाला होता. पोलिसांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला असता आतून दुर्गंधी येत होती. घराची पाहणी केली असता अनिल खाडे याचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे या संपूर्ण हत्याकांडाचा उलगडा झाला.
पोलिसांच्या तपासानुसार, अनिल खाडे आणि विष्णू कुंभार हे दोघे मित्र होते. रात्री दोघांनी एकत्र दारू प्यायली होती. यावेळी त्यांच्यात वाद झाला. याच वादातून विष्णू कुंभार याने अनिल खाडे याच्या डोक्यात लोखंडी वस्तूने वार करून त्याला बेशुद्ध केले. त्यानंतर कोयत्याने गुडघ्यापासून दोन्ही पाय वेगळे केले.
हत्येनंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने मृतदेहाचे विभक्त केलेले दोन्ही पाय पोत्यात भरले आणि रामकृष्ण मंगल कार्यालय ते काटेपुरम चौकादरम्यान रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्यात फेकून दिले.कचऱ्याच्या पोत्यात आढळलेल्या सिमकार्डच्या कव्हरमुळे पोलिसांना महत्त्वाचा पुरावा मिळाला.
त्याच धाग्याच्या आधारे सांगवी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपी विष्णू तानाजी कुंभार याला अटक केली. पोलीस उपायुक्त संदीप आटोळे, सहायक पोलीस आयुक्त मनीषा कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी पोलिसांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.
