प्रतिनिधी
महसूल गुप्तचर संचालनालयाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय कुरियर सेवेद्वारे काही अंमली पदार्थांची भारतात तस्करी होत आहे, अशी टीप मिळाल्याच्या आधारावर, मुंबई शाखेच्या अधिकाऱ्यांनी गेल्या बुधवारी (20 ऑक्टोबर 2022), मुंबईतल्या एअर कार्गो संकुलातून, अमली पदार्थांचं एक पार्सल जप्त केलं. पॅरिसहून आलेलं हे पार्सल, नालासोपाऱ्याला पोहोचवलं जाणार होतं.
या पार्सलची सखोल तपासणी केल्यानंतर, त्यातून, 1.9 किलो ऍम्फेटामाइन प्रकारातील पदार्थ (ऍम्फेटामाइन टाईप सबस्टन्स-एटीएस)च्या गोळ्या आढळल्या. या गोळ्यांची आंतरराष्ट्रीय तस्करी बाजारात, 15 कोटी रुपये इतकी किंमत आहे. या गोळ्या कोरुगेटेड(वळया असलेल्या) पॅकेजिंग सामग्रीच्या आत एका पॉलिथीन पिशवीत लपवून आणल्या गेल्या होत्या.
संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक आणि नियोजनबद्ध आखणी करत, हे पार्सल एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे कसे गुप्तपणे पोहचवले गेले, याचा छडा लावला. जेव्हा हे पार्सल संबंधित व्यक्तिपर्यंत पोहोचवले जाणार होते, त्यावेळी, या व्यक्तीला अटक करण्यात आली. त्याच्या मार्फत, या तस्करीत सामील असलेल्या दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचता आलं. या दुसऱ्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, हे पार्सल एका नायजेरियन व्यक्तीला दिलं जाणार होतं. ही माहिती मिळाल्यावर अधिकाऱ्यांनी सापळा रचून, पार्सल घेण्यासाठी आलेल्या नायजेरियन व्यक्तीलाही ताब्यात घेतलं, अशाप्रकारे, या तस्करीप्रकरणी, पोलिसांनी आतापर्यंत तीन व्यक्तींना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.