शालेय विद्यार्थी वाहतुक करणाऱ्या वाहन मालकांनी वाहनांची तपासणी करुन घेण्याचे आवाहन

माझा जिल्हा

प्रतिनिधी

 माहे जूनमध्ये शाळा सुरु होत असून सर्व शालेय विद्यार्थी वाहतुक करणाऱ्या वाहन मालकांनी त्यांच्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्राची तपासणी करुन घेण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड यांनी केले आहे.

स्कूल बस नियमावलीमधील विद्यार्थी व वाहनाचे सुरक्षेच्यादृष्टीने आवश्यक असणाऱ्या बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे. स्पीड गव्हर्नर, वैध योग्यता प्रमाणपत्र, वैध विमा प्रमाणपत्र, वाहनामध्ये परिचारक असणे, अग्निशमन यंत्रणा असणे इत्यादी बाबींचा त्यामध्ये समावेश आहे. स्कूल बस नियमावलीची पूर्तता करीत असल्याची व शालेय विद्यार्थी वाहतुकीचा परवाना असल्याची खातरजमा करुनच वाहन मालकांनी विद्यार्थ्यांची वाहतूक करणे आवश्यक आहे.

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय कार्यालयाच्या वायुवेग पथकाद्वारे अवैधरित्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल वाहन तसेच स्कूलबस परवान्यामधील अटींचा वा स्कूलबस नियमावलीमधील तरतूदीचा भंग करून चालवणाऱ्या स्कूल व्हॅन व स्कूल बस यांवर कारवाईसाठी चार पथकास आदेशित करण्यात आलेले आहे. यामध्ये प्रामुख्याने स्कूल बस नियमावलीमधील वाहनात सुरक्षेच्यादृष्टीने आवश्यक असणाऱ्या बाबीचा भंग करुन पूर्तता न करणारी वाहने, स्पीड गव्हर्नर नसलेली वाहने, आसनक्षमतेचा भंग करून चालणारी वाहने, बंध योग्यता प्रमाणपत्र नसलेली वाहने, वैध विमा प्रमाणपत्र नसलेली वाहने, परिचारक नसलेली वाहने, अग्निशमन यंत्रणा नसलेली वाहने याबाबींची तपासणी करण्यासाठी विशेष तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे.

सर्व संबंधित वाहन मालकांनी त्यांच्या वाहनाचे परवाना नुतनीकरण करून, योग्यता प्रमाणपत्र तपासून घ्यावे आणि स्कूल बस नियमावलीमधील तरतुदीच्या अनुषंगाने सुरक्षेच्यादृष्टीने आवश्यक बाबींची पूर्तता करण्यात यावी, असेही कळविण्यात आले आहे.