‘शासन आपल्या दारी’ अभियान यशस्वी करण्यासाठी बारामती प्रशासनाची जय्यत तयारी

माझा जिल्हा

प्रतिनिधी

बारामती तालुक्यामध्ये नागरिकांना शासनाच्या विविध लोकल्याणकारी योजनांचा लाभ एकाच छताखाली देण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत असून नागरिकांनी या अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

लाभार्थ्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा ग्रामस्तरावर एकाच छताखाली लाभ देण्यासाठी योजनांचे एकत्रीकरण करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. अद्यापपर्यंत कोणत्याही योजनेचा लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांचा शोधू घेवून त्यांना लाभ देण्यात येणार आहे. योजनेचा लाभ देताना लाभार्थीला परिपूर्ण लाभ देण्यात येईल याकडे प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.

‘शासन आपल्या दारी’ या अभियानाची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यासाठी तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी तालुका, गट व ग्रामस्तरावर संनियत्रण अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तालुकास्तरावर एक तालुका नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या अभियानाअंतर्गत देण्यात येणाऱ्या लाभाची वयोगट, सामाजिक लाभ आणि व्यावसायिक अशी तीन गटात विभागणी करण्यात आली आहे.

*वयोगटानुसार देण्यात येणारे लाभ:*

जन्माच्यावेळी देण्यात येणाऱ्या लाभामध्ये जननी सुरक्षा योजना, बेबी केअर कीट, सीआरएस प्रमाणपत्र, जन्माच्यावेळी आधारकार्ड, जात प्रमाणपत्र, शिशु वयोगट अंगणवाडीमध्ये नावनोंदणी, इंद्रधनुष्य मोहीम, आर.बी.एस.के. तपासणी, कुपोषण मुक्ती व सुकन्या समृद्धी, प्राथमिक शाळेकरीता बालभारतीची पुस्तके, शाळेचा गणवेश, किशोरवयीन मुलींकरीता कौशल्य प्रशिक्षणाअंतर्गत एमएससीआयटी व अनेमियामुक्त भारत, युवकांसाठी रोजगार मेळावा व कौशल्य प्रशिक्षण प्रमाणपत्र, सर्वसामान्य नागरिकांना ग्रामंपचायतीमार्फत देण्यात येणारे सर्व प्रकारचे दाखले, रहिवाशी पुरावा, उत्पनाचा दाखला, सातबारा आणि आठ (अ), आठ (अ) वर महिलांच्या नावांची नोंदणी करणे, आधारकार्डचे अद्यावतीकरण आणि महिलांसाठी स्वयंसहायता गटांना कर्ज वितरण आणि मागणी नुसार प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

*सामाजिक लाभ:*

आरोग्य विभागाअंतर्गत आरोग्य शिबीराचे आयोजन, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत कार्ड नोंदंणी व वितरण करणे, दिव्यांगाना सहाय्यक मदत उपकरणे, श्रवणयंत्रे आणि व्हीलचेअर, युडीआयडी कार्ड, डोळ्याची तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. दिव्यांग, विधवा, ज्येष्ठ नागरिक आदी पात्र लाभार्थ्यांना सेवानिवृत्तीवेतन सुविधा उपलब्ध करणे. सर्व्हेक्षण झालेल्या गावामध्ये नागरिकांना सनद वाटप करणे. प्रत्येक घरात स्वच्छतागृहाची उपलब्ध करुन देणे. विविध आवास योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

*व्यवसायिक लाभ:*

दूध उत्पादकांसाठी सर्वांसाठी गोठा योजना, केसीसी डेअरी, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, मुद्रा कर्ज योजना, महाडीबीटी अंतर्गत नोंदणी करणे. शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्ड, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभ, ठिबकसाठी मुदत कर्ज (अटल भुजल अनुदान), ट्रॅक्टर कर्ज मंजुरी, पीएम किसान योजनेअंतर्गत ई-केवायसी, पीक विमा योजना, मागेल त्याला शेततळे, मातीपरीक्षण, पीएम कुसुम कृषिपंप योजनेकरीता नाव नोंदणी करणे. बँकेमार्फत प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, प्रधानमंत्री जीवनसुरक्षा योजना व जनधन योजनेअंतर्गत खाते उघडण्यात येणार आहे.

‘शासन आपल्या दारी’ अभियान यशस्वी करण्याच्यादृष्टीने बारामती प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. यामध्ये तहसिल कार्यालय, पंचायत समिती, नगरपरिषद, कृषी विभाग, आरोग्य विभाग, एकात्मिक बालविकास प्रकल्प, शालेय शिक्षण विभाग, कौशल्य विकास विभाग,पोस्ट कार्यालय, संबंधित बँकासह संबंधित विभागही सहभागी झाले आहेत, अशी माहिती तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिली आहे.