चतुरस्त्र कवी विनोद अष्टुळ यांचा पुणे महानगर पालिकेकडून सन्मान 

माझा जिल्हा

प्रतिनिधी

साहित्य सम्राट पुणे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोदजी अष्टुळ यांनी या महिन्यात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करताना पाच वेगवेगळ्या ठिकाणी कविसंमेलने घेतली. अष्टुळ गेली चौदावर्षे साहित्य क्षेत्रामध्ये नावीन्यपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबवित आहेत. त्यांनी आजपर्यन्त १७६ कविसंमेलनातून मराठी, हिन्दी, उर्दू आणि ख्रिस्ती साहित्यिकांना पदपथ, मंदिरे, बगिचा. सोसायटी, सभागृहे आणि स्मशानभूमि मध्ये सुद्धा व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. ते शाळा, महाविद्यालये आणि उत्सवासाठी काव्य बोले काळजाला हा विशेष उपक्रम नित्य घेत आहेत. त्यांनी फकिरा कादंबरीतील जोगणी या एका शब्दासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये पाच वर्षे सातत्याने पाठपुरावा केला आणि एम. ए मराठी अभ्यासक्रमातील चूक दुरुस्त करून घेतली. यासाठी अष्टुळ यांचा सन्मान पुणे महानगरपालिका मराठी भाषा संवर्धन तथा पुणे शिक्षण मंडळ माध्यमिक विभागाच्या अधिकारी सौ. देशपांडे मॅडम आणि साहित्य सम्राटच्या एकशे शाहत्तराव्या कविसंमेलनाचे अध्यक्ष चंद्रकांत शहासणे यांच्या शुभहस्ते महापालिकेच्या मराठी भाषा पंधरवडा ग्रंथ प्रदर्शन पु. ल. देशपांडे उद्यान पुणे येथे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

यावेळी विनोद अष्टुळ प्रामाणिकपणे आणि सर्वाना सोबत घेऊन कार्य करणारे कुशल संघटक आहेत. त्यांच्या साहित्य सम्राटचे कविसंमेलन हे दरवर्षी महापालिकेच्या या कार्यक्रमाचा कळस असते. असे देशपांडे यांनी गौर उद्गार काढले. तसेच विनोद अष्टुळ हा महाराष्ट्रात मी असा पहिला कवी पाहिला. तो चतुरस्त्र आहे. त्याची कार्य करण्याची पद्धत कौतुकास्पद आहे. १६ औगस्ट ओरडला या कवितेत वेदना आणि आक्रोश मांडताना कोणाच्याही भावना न दुखवता त्यांनी कुठेही बोट दाखविले नाही. पण तळागाळापासून सर्वांना झोडपून काढले. अशीच कवींना जाण असली पाहिजे. या नावीन्यपूर्ण कविसंमेलनात राहुल भोसले, नकुसाबाई लोखंडे, प्रिया दामले, डॉ. सुशील सातपुते, विकी कांबळे, प्रतिभा मगर, सुवर्णा जाधव, अशोक जाधव, दत्तात्रय खंडाळे, निवेदिता कुलकर्णी, विवेक म्हस्के प्रा.आनंद महाजन, राहुल जाधव अशा अनेक दिग्गज कवी कवयित्रींनी आपल्या बहारदार रचना सादर करुन ग्रंथ प्रदर्शनातील पुस्तक विक्रेते, वाचक आणि काव्य रसिक यांना खिळवून ठेवले. या संमेलनाचे सूत्रसंचालन कविराज विजय सातपुते यांनी तर सर्वांचे कौतुक व आभार प्रा. अशोक शिंदे यांनी व्यक्त केले.