चंद्रपुरातील स्व. उत्तमराव पाटील वन उद्यानात जॉगर्स पार्क उभारण्याचा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्णय

Uncategorized

निसर्ग पाउलवाट, लेझर शो , एनर्जी पार्क , चंदनवन व जांभुळवन आदिंची निर्मिती होणार

हा जॉगर्स पार्क नागरिकांच्या , पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरेल: सुधीर मुनगंटीवार

चंद्रपुरातील स्व. उत्तमराव पाटील वन उद्यानात जॉगर्स पार्क उभारण्याचा निर्णय वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे.यासंदर्भात दिनांक २३ नोव्‍हेंबर रोजी चंद्रपूरात वनप्रबोधिनी येथे झालेल्‍या बैठकीत यासंदर्भात चर्चा व सादरीकरण करण्‍यात आले.यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव महिप गुप्ता, प्रधान मुख्य वनसंरक्षक सामाजिक वनिकरण सुनीता सिंग, वन अकादमीचे संचालक एम.एस. रेड्डी, ताडोबाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर, वन प्रबोधिनीचे अपर संचालक प्रशांत खाडे, वन प्रबोधिनीचे सल्लागार मंगेश इंदापवार, आर्कीटेक्ट जगन्नाथ चावडेकर, श्री. प्रकाश धारणे आदींची उपस्थिती होती.या जॉगर्स पार्क मध्ये निसर्ग पाऊल वाट तयार करण्‍यात येणार असून एक पेव्‍हर ब्‍लॉकची तर दुसरी मातीची असणार आहे.फुलपाखरु उद्यानामध्‍ये वेगवेगळया जातीची रोप लावण्‍यात येणार आहे. जेणेकरुन ते फुलपाखरांना आकर्षित करु शकते. त्‍यामध्‍ये नेक्‍टर प्‍लॅंन्‍टस व होस्‍ट प्‍लॅन्‍ट असतील.लहान व मोठया मुलांकरीता साहसी खेळाकरीता साहित्‍य उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहे.पाण्‍याचे दोन तलाव तयार करण्‍यात येणार असून एक स्‍वतंत्र तलाव कारंज्‍यांचे असेल.त्या माध्यमातून मनोहारी दृश्य देखावा निर्माण होणार आहे.वयोवृध्‍द नागरिक महिला यांच्‍या विश्रांतीकरीता पॅगोडा तयार करण्‍यात येणार आहे. याठिकाणी चंदनवन व जांभूळवन तयार करण्‍यात येणार आहे.दोन-तीन वेगवेगळे वॉच टॉवर तयार करण्‍यात येतील.असंख्‍य दुर्मीळ झाडांचे रोपण करण्‍यात येईल जे लुप्‍त होत आहेत त्या माध्यमातून जैवविविधतेचे सरंक्षण व संवर्धन करण्यात येणार आहे.योगा, झुंबा करण्‍याकरीता स्‍वतंत्र क्षेत्र निर्माण करुन व्‍यवस्‍था करण्‍यात येईल.यामध्‍ये एनर्जी पार्क तयार करण्‍यात येईल. हा एनर्जी पार्क ओपन जिम सारखा असेल, परंतु त्‍यामधून वीज निर्मिती होईल. त्‍या वीजनिर्मितीच्‍या आधारे लाईट, फवारे, पंप चालविले जाणार आहेत.या जॉगर्स पार्क मध्ये एक लेझर शो तयार करण्‍यात येणार आहे. ज्‍यामध्‍ये आजोबा नातवाला त्‍यांच्‍या काळाची गोष्‍ट सांगतील ज्‍याच्‍यामध्‍ये त्‍यांच्‍या काळातील प्राणी, वनस्‍पती यांची माहीती असेल. परंतु त्‍यांच्‍या काळातील प्राणी, वनस्‍पती वातावरणीय कसे बदलत गेले व फरक पडत गेला हे सांगतील.ज्ञान संवर्धनाची प्रक्रिया गतिमान करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येईल.मोगली या पात्राचा जन्‍म ते मृत्‍यु पर्यंतची कहाणी दर्शविण्‍यात येईल. यामध्‍ये काही ओरिजनल स्‍टॅच्‍यु व काही लेझर शो च्‍या निर्मितीने त्‍याचे एकुण जीवन चरित्र रंगविण्‍यात येईल.अत्याधुनिक पद्धतीचा हा जॉगर्स पार्क नागरिकांच्या , पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरेल असा विश्वास वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला असुन जलदगतीने या जॉगर्स पार्क शी संबंधित कामे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी वनाधिका-यांना दिले.