कौन्सिल हाॅल रस्त्यावर भरधाव बुलेट घसरून युवकाचा मृत्यू; आठवडभरात दुसरा बुलेट अपघात

क्राईम

प्रतिनिधी

भरधाव बुलेट घसरुन युवकाचा मृत्यू झाल्याची घटना कौन्सिल हॉल रस्त्यावर घडली. अपघातात युवकाबरोबर असलेला सहप्रवासी मित्र गंभीर जखमी झाला. एरंडवणे भागातील भरतकुंज परिसरात बुलेट घसरुन युवकाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती. बुलेट घसरुन झालेल्या अपघातात दोन युवकांचे मृत्यू झाले. भरधाव वेगामुळे अशा प्रकारचे अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अर्पित शर्मा (वय २२, रा. कोरेगाव पार्क) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. अपघातात बुलेटवरील सहप्रवासी युवक रोहित शर्मा गंभीर जखमी झाला. २७ ऑक्टोबर रोजी रात्री पावणेएकच्या सुमारास कौन्सिल हाॅल रस्त्यावर ही घटना घडली. याबाबत पोलीस कर्मचारी दत्तात्रय सुळ यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बुलेटस्वार अर्पित आणि त्याचा मित्र रोहित शर्मा हे २७ ऑक्टोबर रोजी रात्री पावणेएकच्या सुमारास कौन्सिल हाॅल रस्ता परिसरातून भरधाव वेगाने निघाले होते. बुलेटस्वार अर्पितचे नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या कडेला लावलेल्या वाहनावर बुलेट आदळली. अपघातात अर्पित आणि त्याचा मित्र रोहित गंभीर जखमी झाले.

उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात अर्पितचा मृत्यू झाल्याची माहिती बंडगार्डन पोलिसांनी दिली. सहायक पोलीस निरीक्षक मुजावर तपास करत आहेत. भरधाव वेगामुळे अपघात बुलेट शक्यतो घसरत नाही. भरधाव वेगामुळे नियंत्रण सुटल्याने शहरातील एरंडवणे आणि कौन्सिल हॉल रस्ता परिसरात झालेल्या अपघातात बुलेटस्वार युवकांचे मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. एरंडवणे भागातील भरतकुंज परिसरात २३ ऑक्टोबर रोजी बुलेटवरील नियंत्रण सुटून दुभाजकावर आदळली. या अपघातात बुलेटस्वार महाविद्यालयीन युवक यश कमलेश दहिवळ (वय १७, रा. हिंगणे खुर्द, सिंहगड रस्ता) याचा मृत्यू झाला. अपघातात पादचारी श्रीकांत दातार (वय ८६) आणि जयराज राजेश हुलगे (वय १८, रा. हिंगणे खुर्द, सिंहगड रस्ता) जखमी झाले होते.