कोल्हेवाडीत भरदिवसा तरुणाचा खून, आर्थिक वादातून खून झाल्याची माहिती

क्राईम

प्रतिनिधी

सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी भागात तरुणावर कोयत्याने वार करून खून केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. भरदिवसा तरुणाचा खून झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात घबराट उडाली. याप्रकरणी आरोपींविरुद्ध हवेली पोलिसांकडून गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

सतीश सुदाम थोपटे ( वय ३८, सध्या रा. सुशीला पार्क, कोल्हेवाडी खडकवासला, मूळ रा. खानापूर, ता. हवेली: असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. थोपटे हा जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार करायचा. त्याच्याविरुद्ध हवेली पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. थोपटे बुधवारी दुपारी कोल्हेवाडी भागात थांबला होता. त्यावेळी टोळक्याने त्याच्यावर कोयत्याने हल्ला चढविला. टोळक्याने केलेल्या हल्ल्यात थोपटे गंभीर जखमी झाला. त्याला नागरिकांनी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

थोपटे याच्या नावावर सदनिका खरेदीसाठी एकाने २५ लाख रुपयांचे कर्ज काढले होते. कर्जाचे हप्ते थकल्याने त्यांच्यात वाद झाला होता. आर्थिक वादातून थोपटे याचा खून करण्यात आल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे, असे पोलीस निरीक्षक वांगडे यांनी सांगितले. पसार झालेल्या हल्लेखोरांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. थोपटे याच्यामागे आई, वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.