सोमेश्वरनगर :सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने “रस्ते सुरक्षा व वाहतुकीचे नियम” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेसाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती येथील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. सुरेंद्र प्रकाश निकम हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी रस्ते सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांना अपघात टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी, सुरक्षित वाहन चालवण्याचे नियम, तसेच वाहतुकीचे नियम पाळण्याचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
वाहन चालवताना बेफिकिरी, हेल्मेटचा अभाव, अतिवेग, वाहतुकीचे नियम न पाळणे ही अपघातांची प्रमुख कारणे असल्याचे त्यांनी सांगितले. आपण परदेशात नियमांचे काटेकोर पालन करतो; मात्र आपल्या देशात दुर्लक्ष करतो, ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वाहतूक नियमभंगावर दंडात्मक कारवाई केली जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.
अपघात झाल्यास किंवा आपत्कालीन परिस्थितीत ११२ या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा, वैद्यकीय मदतीसाठी सहकार्य करावे व अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. अल्पवयीन मुलांनी वाहन चालवल्यास त्यांच्या पालकांवर कारवाई केली जाते, याचीही माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. जगन्नाथ साळवे, डॉ. जया कदम, प्रा. अच्युत शिंदे, डॉ. संजू जाधव, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. अनिल शेलार, श्री. गोरखनाथ बोऱ्हाडे व श्री. किशोर विलास शेळके (स्वामी) आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना (बी–०२१) कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. आदिनाथ लोंढे यांनी केले, तर आभारप्रदर्शन प्रा. डॉ. नारायण राजूरवार यांनी केले.













