मुंबईतील रोजगार मेळाव्यात 395 उमेदवारांना केंद्र सरकारचे मिळाले पत्र

Uncategorized

संपादन मधुकर बनसोडे.
नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सेवा आणि जबाबदारीच्या भावनेने काम करण्याचे मंत्री पियुष गोयल यांनी केंद्र सरकारच्या नवनियुक्तांना केले आवाहन

प्रत्येक नागरिकाला चांगले भविष्य कसे देता येईल याचा विचार करावा : केंद्रीय मंत्री पीयूष गोयल

भारत सरकारने 10 लाख युवकांना भारतीय नागरी सेवांमध्ये समाविष्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भरती मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज रोजगार मेळाव्याने झाला. या मोहिमेच्या सुरुवातीलाच भारत सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये 75,000 युवकांची भरती करण्यात आली आहे. या संदर्भात पंतप्रधानांनी मनुष्‍य बळ विकास खात्याचा आढावा घेतल्यानंतर देशभरामध्‍ये भरती मोहीम राबविण्‍याची घोषणा पंतप्रधानांनी 14 जून 2022 रोजी केली होती. या घोषणेनुसार आगामी एक वर्षाच्या आत मिशन मोडमध्ये 10 लाख लोकांची भरती सरकारकडून केली जाणार आहे. ही भरती मंत्रालये आणि विभाग करणार आहेत किंवा यूपीएससी, एसएससी आणि रेल्वे भर्ती मंडळ यांसारख्या भरती संस्थांद्वारे केली जात आहेत. जलद भरतीसाठी निवड प्रक्रिया सरलीकृत आणि तंत्रज्ञान-सक्षम करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्‍य प्रणालीद्वारे राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रमात रोजगार मेळा सुरू केला आणि देशातील पन्नास ठिकाणांहून या कार्यक्रमात सामील झालेल्या नव नियुक्त उमेदवारांना मार्गदर्शन केले. पंतप्रधान रोजगार मेळ्याचे कारण स्पष्ट करताना म्हणाले की, स्वातंत्र्याची 75 वर्षे लक्षात घेऊन केंद्र सरकार एकाच कार्यक्रमांतर्गत 75,000 तरुणांना नियुक्ती पत्र देत आहे. “आम्ही ठरवले की, एकाच वेळी नियुक्तीपत्रे देण्याची परंपरा सुरू करावी त्यामुळे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचा सामूहिक स्वभाव, भावना सर्व विभागांमध्ये विकसित होईल”. आगामी काळातही उमेदवारांना शासनाकडून वेळोवेळी नियुक्तीपत्रे मिळणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील मजकूर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.’’

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार आणि अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल रोजगार मेळाव्याच्या मुंबईतील कार्यक्रमात सहभागी झाले. मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात एकूण 395 उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्‍यात आले. केंद्रीय मंत्र्यांनी तीस नवीन भरती झालेल्यांना समारंभपूर्वक नियुक्तीचे पत्र दिले. नवीन भरती झालेल्यांना टपाल विभाग, पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, तटरक्षक दल, सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय, भारतीय नौदल, सीआयएसएफ, आरसीएफ, माझगाव डॉक्स लिमिटेड, प्राप्तीकर, सीबीआयसी, ईएसआयसी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, अशा विविध ठिकाणी नियुक्ती मिळाल्या आहेत. युनियन बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, विदर्भ कोकण ग्रामीण बँक, कॅनरा बँक, एनबीसीसी आणि सीमेन्स प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन मुंबई, आयआयटी मुंबई, एनआयएफटी आणि बीएसएफ या कार्यालयांमध्‍ये नव्या उमेदवारांची नियुक्ती केली आहे.

केंद्र सरकारमध्ये नवनियुक्त युवकांना संबोधित करताना, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सेवाभावी वृत्ती आणि जबाबदारीच्या भावनेने काम करण्याचे आवाहन केले. सरकारी सेवेत प्रवेश करण्यापूर्वी तुमच्या काय अपेक्षा होत्या, याचा विचार करा. सरकारी कार्यालये व्यवस्थित चालावीत, नागरिकांना चांगली सेवा तेथून दिली जावी आणि कार्यालयांमध्ये स्वच्छता राखली जावी, अशा आम्ही सहसा अपेक्षा करतो. हे सांगत असतानाच गोयल यांनी नागरिकांच्या या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने काम करण्याचा सल्ला त्यांना दिला. नवीन उमेदवार जे पारदर्शक प्रक्रियेतून इथपर्यंत आले आहेत, ते लोक सेवा करण्याची मानसिकता घेऊन काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते जसे काम करत जातील तसतसे त्यांच्याकडील कौशल्याचा दर्जा उन्नत होत जाईल, असे गोयल म्हणाले.

केंद्रीय मंत्र्यांनी नवीन निवड झालेल्या उमेदवारांनी आपल्या कामात आपण कोणते नवीन दृष्टीकोन आणू शकतो, यावरही विचार करावा, असे आवाहन केले. आपल्या जबाबदार्या अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी त्यांनी स्वतःला अर्धे बाहेरचे आहोत, असे कल्पून विचार करावा आणि त्यानुसार स्वतःमध्ये सुधारणा घडवत जावी.

गोयल यांनी नव्या उमेदवारांना सरकारी विभागांच्या कामकाजात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा कसा उपयोग करता येईल, यावर विचार करण्याचाही सल्ला दिला. केंद्रीय मंत्र्यांनी नवीन भरती झालेल्यांकडून प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी नवीन कल्पना आणि सूचनांही करण्याचे आवाहन केले. देशाच्या 135 कोटी नागरिकांचे विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्याची मनिषा बाळगून सर्व सरकारी सेवकांनी वाटचाल करण्याचे आग्रहपूर्वक सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला 2047 पर्यंत विकसित देश बनवण्यासाठी काम करण्याचे आग्रहाने बजावले आहे, असे सांगतानाच, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी नव्य़ाने भरती झालेल्या तरूणांना प्रत्येक नागरिकाला उज्वल भविष्याची भेट कशी देता येईल, याचा विचार करण्यास सांगितले. ते म्हणाले की विकसित भारताची उभारणी करायची असेल तर त्यात प्रत्येक नागरिकाचा सहभाग अत्यंत आवश्यक आहे. आम्ही सर्वांनीच विकसित देश बनवण्याच्या कामी योगदान दिले पाहिजे, असे ते पुढे म्हणाले.

केंद्रीय मंत्री गोयल म्हणाले की, जुन्या फायलींचा ढिग साचून ठेवण्याची आमची वसाहतवादी मानसिकता झटकून टाकली पाहिजे. आम्ही सर्वांनी असा निर्धार केला की आम्ही आमचे काम संपूर्ण डिजिटल करू आणि वसाहतवादी मानसिकतेला पूर्णविराम देऊ, तर कल्पना करा राष्ट्राप्रती केवढे महान योगदान असेल. सरकारी विभागांमधील डिजिटायझेशनच्या कामाबद्दल केंद्रीय मंत्री म्हणाले की, अनेक सरकारी विभागांमध्ये ई फाईल्स बनवल्या जात आहेत. तसेच, थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेत जेएम ट्रिनिटीद्वारे गळती रोखण्यास सहाय्य झाले आहे, ज्यामुळे लाभ लोकांच्या बँक खात्यांत थेट जमा होतात. या प्रत्येकाचे कळफलक म्हणजे डॅशबोर्ड संकेतस्थळांवर सार्वजनिक दृष्ट्या पाहायला उपलब्ध आहेत, असे ते म्हणाले.

केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की पंतप्रधानांनी आपलियी मुळांकडे जाऊन काम करण्याचाही आम्हाला उपदेश केला आहे. आमच्या परंपरांकडून खूप काही आम्हाला शिकण्यासारखे आहे. देशाचे ऐक्य आणि अखंडत्व यांना कायमच लक्षात ठेवले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, 135 कोटी लोक जोपर्यंत राष्ट्राच्या विकासासाठी काम करताना जबाबदारीची जाणीव ठेवत नाहीत, तोपर्यंत कामाच्या परिणामात सुधारणा होणार नाही. एकदा आम्ही कर्तव्यभावना त्यात आणली की काम अधिक चांगले होईल आणि ते लोकांच्या हिताचे असेल. भ्रष्टाचार मुक्त भारताच्या दिशेने आम्हाला काम करण्याची आवश्यकता आहे, असे ते पुढे म्हणाले.

विविध मंत्रालये आणि सरकारी विभागांमधील नव्याने नियुक्त झालेल्यांच्या बरोबर, महाराष्ट्र सरकारमधील पर्यटन, कौशल्य विकास आणि व्यावयासिकता तसेच महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, उत्तर मुंबईचे लोकसभा मतदारसंघातील सदस्या पूनम महाजन, मुख्य पोस्टमास्तर जनरल वीणा श्रीनिवास उपस्थित होत्या.

नागपूर येथील कार्यक्रमात 213 युवकांना नियुक्तीपत्र देण्यात आले. बँक, रेल्वे, पोस्ट, इन्कम टॅक्स यासह केंद्र शासनाच्या विविध जवळपास 38 विभागांमध्ये ही नियुक्ती होणार आहे. आज एकाच दिवशी देशभरात 75 हजार युवकांना नियुक्ती पत्र दिले गेले. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची याप्रसंगी उपस्थिती होती.
रामदास आठवले यांनी सरकारी नोकरीवरील अघोषित बंदी उठविण्याची घोषणा केल्याबद्दल राज्य सरकारचे कौतुक केले. केंद्राप्रमाणे राज्य शासनाने हे धाडसी पाऊल उचलल्यामुळे अनेक सुशिक्षित बेरोजगारांना संधी मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यावेळी केंद्र शासनाच्या विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती व शासकीय नोकऱ्यांमध्ये भारतीय ही प्रक्रिया यापुढे गतीने राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.