बारामती नगरपरिषदेस ‘माझी वसुंधरा अभियान ३.०’ स्पर्धेत तृतीय पुरस्कार

माझा जिल्हा

प्रतिनिधी

 राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या महत्वकांक्षी ‘माझी वसुंधरा अभियान ३.०’ स्पर्धेचा निकाल काल पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन जाहिर करण्यात आला. या अभियानात बारामती नगरपरिषदेला ५० हजार ते १ लक्ष लोकसंख्या असलेल्या गटामध्ये राज्यस्तरावरील तृतीय क्रमांकाचा पुरस्कार महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

माझी वसुंधरा अभियान १.० मध्ये बारामती नगर परिषदेने राज्यात बारावा क्रमांक तर अभियान २.० मध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केला होता. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या बळावर नगरपालिकेने ३ कोटी रुपयांचा हा मानाचा पुरस्कार मिळविला आहे.

बारामती शहरात गेल्या वर्षभरात जवळपास २० हजाराहून अधिक वृक्षांची लागवड व त्यांचे संवर्धन करण्यात आले. नगर परिषद, फोरम ऑफ इंडिया, शैक्षणिक संस्था आणि लोक सहभागातून हा उपक्रम राबविण्यात आला. शहरात नवीन रोपवाटिका तयार करण्यात आल्या. घनकचरा व्यवस्थापनअंतर्गत शंभर टक्के कचरा संकलन करून ९० टक्के पेक्षा जास्त कचऱ्याचे वर्गीकरण करून ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून बायोगॅस, पीट, वर्मी, कंपोस्ट, प्लांट ची निर्मिती करण्यात आली. सुक्या कचऱ्यावरील प्रक्रियेकरता खाजगी कंपन्यांसोबत करार आणि सामाजिक दायित्व निधीतून साहित्य पुनर्प्राप्ती सुविधा उभारणी आणि घरगुती जैव वैद्यकीय कचऱ्याचे स्वतंत्ररीत्या संकलन करण्यात आले.

जल: तत्वाशी संबंधित नदी संवर्धन, कालवे, साठवण तलाव, पाण्याच्या टाक्या यांची स्वच्छता करण्याची मोहिम हाती घेतली. कऱ्हानदी स्वच्छता मोहीम हाती घेऊन भव्य सुधार प्रकल्प राबवण्यात आला. निरा डावा कालवा सुशोभीकरणाचे काम पूर्णत्वाला गेले असून जवळपास सहा किलोमीटर एवढ्या लांबीची अस्तरीकरण करून कालव्याच्या दोन्ही बाजूने सुशोभीकरण करण्यात आले असून त्या ठिकाणी वृक्षारोपण करून ज्येष्ठ नागरिक व लोकांना विरंगुळ्यासाठी व व्यायामासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.

भोगवटा प्रमाणपत्र देताना रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणाली बंधनकारक करण्यात आली आहे. बांधकाम विभागाकडून सार्वजनिक इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि पर्क्युलेशन पीट तयार करण्यात आले आहे. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर वृक्षांना पाणी देणे बांधकाम क्षेत्रासाठी करण्यात आला.

बारामती नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रामध्ये वास्तव्य करणाऱ्या जवळपास ११ सार्वजनिक इमारतींवर सौर ऊर्जा पॅनल स्थापित करण्यात आले. विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारणे व विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या खरेदीसाठी लोकांमध्ये जनजागृती करणे इत्यादी कामे करण्यात आली. एलईडी दिव्यांचा वापर वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

वायू:तत्वाचे संरक्षण करता यावे म्हणून हवेच्या गुणवत्तेसाठी वायूप्रदूषण कमी करून हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यावर भर देण्यात आला बारामती सायकल क्लबच्या माध्यमातून सायकलच्या वापरास प्रोत्साहन देण्याकरता व्यापक प्रमाणात जागृती करण्यात आली. माझी वसुंधरा या पंचतत्वांचा प्रचार करण्यासाठी शहरातील विविध शाळा, महाविद्यालय आणि शहरातील नागरिकांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या.

प्लास्टिक पिशवीला पर्याय म्हणून कापडी पिशवी आणि कागदी पिशवीचा व्यापक स्वरूपात प्रचार करण्यात आला. शहराचा वेगाने विकास होत असताना तो शाश्वत असावा या दृष्टीने पर्यावरणाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नगरपरिषदेचा प्रयत्न आहे. त्यासाठी विकास कामासोबत पर्यावरण ही संकल्पना घेऊन नगरपरिषदेने विकास प्रक्रिया राबवली आहे.

महेश रोकडे, मुख्याधिकारी : माझी वसुंधरा अभियान ३.० यामध्ये शहरातील नागरिक, सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालय, सायकल क्लब व नगरपरिषद कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. पर्यावरणपूरक शाश्वत विकासाच्यादृष्टीने नगरपालिकेने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याने हे यश शक्य झाले.