गोवर रोगाच्या प्रादुर्भावाचे मूल्यांकन आणि व्यवस्थापन करण्यासाठी केंद्र सरकारकडून उच्चस्तरीय पथक मुंबईत तैनात

Uncategorized

प्रतिनिधी

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने मुंबईतील गोवरच्या वाढत्या रुग्णसंख्येचा आढावा घेण्यासाठी एक उच्चस्तरीय बहु-शाखीय पथक मुंबईत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. हे पथक राज्याच्या आरोग्य प्रशासनाला सार्वजनिक आरोग्य उपाययोजना आखण्यात तसेच आवश्यक नियंत्रण आणि प्रतिबंधात्मक उपाय कार्यान्वित करण्यात मदत करेल.

मुंबईला जाणाऱ्या 3 सदस्यीय केंद्रीय पथकामध्ये राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC), नवी दिल्ली, लेडी हार्डिंग वैद्यकीय महाविद्यालय, नवी दिल्ली आणि प्रादेशिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण कार्यालय, पुणे, महाराष्ट्र मधील तज्ञांचा समावेश आहे. या पथकाचे नेतृत्व एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रमाचे उपसंचालक डॉ. अनुभव श्रीवास्तव करत आहेत.

मुंबईत गोवरच्या वाढत्या रुग्णसंख्येचे व्यवस्थापन करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य उपाययोजना, व्यवस्थापन मार्गदर्शक तत्त्वे आणि प्रोटोकॉल संदर्भात राज्याच्या आरोग्य विभागांना मदत करण्यासाठी आणि प्रादुर्भावाचा आढावा घेण्यासाठी हे पथक प्रत्यक्ष भेट देखील देईल.