*उपमुख्यमंत्री अजित पवार यांची टंचाईग्रस्त गावाला भेट; नागरिकांशी साधला संवाद*

Uncategorized

स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन पाण्याचे टँकर व चारा डेपोची व्यवस्था करा-उपमुख्यमंत्री.

बारामती, दि.८:  तालुक्यात पावसाने मोठ्या प्रमाणात ओढ दिल्यामुळे टंचाईसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांनी पाण्याचे टँकर, चारा डेपो, चारा छावण्या सुरु करण्याबरोबरच विविध मागण्या केल्या आहेत. प्रशासनाने स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन पाण्याचे टँकर व चारा डेपोची व्यवस्था करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी आज तालुक्यातील जळगाव सुपे, देऊळगाव रसाळ, पानसरेवाडी, काऱ्हाटी, तरडोली, आंबी खु, आंबी बु. आणि सुपे या टंचाईग्रस्त गावांची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे  मुख्य अभियंता हणुमंत गुणाले, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, जनावरांना चारा उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हा नियोजन विकास समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. आगामी काळातील मान्सून परिस्थितीचा आढावा घेऊन चारा छावण्या सुरु करण्याबाबत विचार करण्यात येईल. जनाई शिरसाई आणि पुरंदर उपसा सिंचन योजनेतील खराब झालेले इलेक्ट्रिक पंप आणि मोटारीची दुरुस्ती करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या माध्यमातून उच्च क्षमतेच्या मोटारी व पंप बसविण्यात येईल. या सिंचन योजनेतून टंचाईग्रस्त भागाला पाणी सोडण्याबाबत योग्यप्रकारे नियोजन करण्यात येईल. देऊळगाव रसाळ येथील तलावातील गाळ काढण्यासाठी मदत केली जाईल.

नागरिकांनी केलेल्या विविध मागण्याबाबत वस्तुस्थिती विचारात घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. पाणी टंचाईच्या संकटावर मात करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. सर्वांनी मिळून पाणी टंचाईच्या संकटावर मात करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन श्री. पवार यांनी केले.

ग्रामपंचायतीच्या विकासकामांसाठी यापूर्वी ६५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. काही तांत्रिक अडचणीमुळे देण्यात आलेली स्थगिती उठविण्यात आली आहे. आता गावातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने विकासकामांबाबत योग्य नियोजन करावे. कामे करीत असताना कामात अडथळा न आणता समन्वयाने दर्जेदार कामे करावीत. सदरचा निधी ३१ मार्च २०२४ पर्यंत खर्च होईल अशा प्रकारे नियोजन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले.

यावेळी महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल पावडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, तहसीलदार गणेश शिंदे, मुख्याधिकारी महेश रोकडे, सहायक निबंधक मिलिंद टांकसाळे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव आदी उपस्थित होते.

टंचाई दौऱ्यापूर्वी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी शहरातील आमराई परिसराला भेट देऊन नागरिकांच्या समस्यांबाबत अधिकाऱ्यांना त्याच ठिकाणी आदेश देऊन त्या दूर केल्या.