चौथी एनआयसीडीसी गुंतवणूकदार गोलमेज परिषद उद्या मुंबईत होणार

Uncategorized

संपादक मधुकर बनसोडे

भारताच्या आर्थिक राजधानीत मुंबईत उद्या 10 ऑक्टोबर 2022 रोजी चौथी एनआयसीडीसी गुंतवणूकदार गोलमेज परिषद होणार आहे.  महाराष्ट्र औद्योगिक टाऊनशिप लिमिटेडने या परिषदेचे आयोजन केले आहे.  नामवंत गुंतवणूकदारांव्यतिरिक्त, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, विविध देशांचे वाणिज्य दूत आणि महाराष्ट्र सरकारमधील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

यापूर्वी गुंतवणूकदारांची गोलमेज परिषद दिल्ली, कोची आणि अहमदाबाद येथे झाली होती. यंदाची ही चौथी परिषद  भारतातील अनेक शहरांत उदयास येत असलेल्या ग्रीनफिल्ड औद्योगिक शहरांत होत असलेला विकास दर्शवणार असून याची योजना राष्ट्रीय औद्योगिक मार्गिका विकास महामंडळाने  आखली आहे.

सध्याच्या घडीला, महाराष्ट्रात औरंगाबाद, रायगड, सातारा आणि नागपूर या  चार ग्रीनफिल्ड  स्मार्ट औद्योगिक शहरांचा विकास करण्यात येणार आहे.  हित धारकांमध्ये अर्थपूर्ण चर्चा घडवून गुंतवणूकदारांसाठी विविध सहकार्याच्या संधी निश्चित करण्याचा परिषदेचा उद्देश आहे.

महाराष्ट्र, भारताचे आर्थिक शक्तीकेंद्र म्हणून ओळखले जात असून जगभरातील गुंतवणूकदारांसाठी आदर्श गुंतवणूक स्थळ राहिले आहे. भारतातील सर्वोच्च परकीय थेट गुंतवणुकीचे स्थळ म्हणून महाराष्ट्र आपले स्थान कायम ठेवण्यात यशस्वी झाला आहे. गेल्या दशकात, देशात थेट परकीय गुंतवणुकीच्या एकूण ओघापैकी महाराष्ट्रात जवळपास एकत्रित 28 टक्के परकीय थेट गुंतवणूक आली आहे. गेल्या आर्थिक वर्षात महाराष्ट्र एकूण 420 अब्ज अमेरिकन डॉलर जीडीपी साध्य करू शकला, यावरून  अर्थव्यवस्थेची मजबुती स्पष्टपणे दिसते.