कारागृहातून सुटताच प्रियकराने थेट प्रेयसीच्या अंगावर घातली कार

क्राईम

प्रतिनिधी

प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवून नातेवाईक तरुणीशी लग्न करणाऱ्या प्रियकरावर तरुणीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्या गुन्ह्यात तो दोन महिने कारागृहात होता. परंतु, कारागृहातून सुटताच त्याने प्रेयसीला कारने धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न केला. कारच्या धडकेत प्रेयसी थोडक्यात वाचली. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. राज ऊर्फ राघवेंद्र राधेश्याम यादव (३१, वासूदेवनगर, हिंगणा) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी राघवेंद्र यादव या वाहतूकदार असून त्याची पीडित २३ वर्षीय तरुणीशी इंस्टाग्रामवरून ओळख झाली होती. २०२० पासून त्यांची मैत्री होती. त्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. तरुणी बी.एड पदवीच्या द्वितीय वर्षाला शिकत होती. दोघांनी प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. लग्न करण्याचे आमिष दाखवून तरुणीला तो वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेऊन शारीरिक संबंध ठेवत होता. तसेच तरुणीच्या घरी जाऊनही पतीप्रमाणे वागत होता. तिच्या आईवडिलांनीही दोघांचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, राघवेंद्रने आपल्या नात्यातील एका तरुणीशी लग्न केले.

त्या लग्नाबाबत प्रेयसीला काहीही सांगितले नाही. लग्न झाल्यानंतरही तो तरुणीशी शारीरिक संबंध ठेवत होता. लग्नासाठी तगादा लावला असता तो नेहमी टाळाटाळ करीत होता. त्यामुळे तरुणीने त्याच्यावर पाळत ठेवली. त्याच्या घरी जाऊन माहिती घेतली. त्यावेळी त्याची पत्नी घरी होती. तिच्याकडून सर्व सत्यता समोर आली. तिने राघवेंद्रला जाब विचारला आणि त्याचा नाद सोडला. काही दिवसानंतर तो तिच्या घरी गेला आणि बदनामी करण्याची धमकी देऊन हिंगण्यातील एका लॉजमध्ये घेऊन गेला. तरुणीने त्याला प्रेमसंबंधास नकार दिल्यानंतरही तो बळजबरी करीत संबंध ठेवत होता. त्यामुळे कंटाळलेल्या तरुणीने त्याच्याविरुद्ध हिंगणा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी ५ डिसेंबर २०२३ रोजी गुन्हा दाखल करून अटक केली. त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली.

राघवेंद्र यादव हा १० जानेवारी २०२४ ला जामीनावर कारागृहातून सुटून बाहेर आला होता. दोन दिवस त्याने काही मित्रांसह मिळून प्रेयसीला ठार मारण्याचा कट रचला. तिच्या मागावर दोन तरुणांना ठेवले. १२ फेब्रुवारीला सायंकाळी तरुणी दुचाकीने तेलंगखेडी मंदिरात दर्शनासाठी गेली होती. तेथून परत येताच राघवेंद्रने तिला रस्त्यावर कारने चिरडण्याचा प्रयत्न केला. मात्र, कारसमोर दुचाकी पडल्याने ती थोडक्यात वाचली. गंभीर जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला