धक्कादायक! राज्यात दिवसाला ३४ बाळांचा गर्भातच मृत्यू!

माझा जिल्हा

प्रतिनिधी

माता व बालमृत्यू रोखण्यासाठी कोट्यवधींचा खर्च करून विविध स्तरावर उपाय करत असल्याचा दावा केंद्र व राज्य शासनाकडून नेहमीच केला जातो. परंतु, राज्यात दर दिवसाला ३४ बाळ मातेच्या गर्भातच दगावत आहेत. याशिवाय प्रत्येक आठ तासांत एक मातामृत्यू होत आहे. ही धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या तपशिलातून पुढे आली आहे.

या तपशिलानुसार, राज्यात १ एप्रिल २०२२ ते ३१ डिसेंबर २०२३ दरम्यान २२ हजार ९८ उपजत मृत्यू (कमी वजनाच्या बाळाचे गर्भातच झालेले मृत्यू) झाले. याच काळात २ हजार ६४ मातामृत्यू नोंदवण्यात आले. या आकडेवारीची दिवसाची सरासरी काढल्यास राज्यात सुमारे ३४ उपजत मृत्यू तर ३ मातामृत्यू होत आहेत. राज्यात १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ दरम्यान १३ हजार ६३५ उपजत मृत्यू तर १ हजार २१७ मातामृत्यू नोंदवले गेले. तर १ एप्रिल २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ दरम्यान ८ हजार ४६३ उपजत मृत्यू तर ८४७ मातामृत्यू नोंदवले गेले. सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारातून हे वास्तव पुढे आणले आहे. राज्य कुटुंब कल्याण कार्यालय, पुणे कार्यालयाने आकडेवारीला दुजोरा दिला आहे.

“अर्भकाची विकलांगता, रक्ताची कमी, विविध संक्रमण, अपघातासह इतरही कारणांमुळे गर्भातच उपजत मृत्यूचे प्रमाण जास्त असते. प्रत्येक मातेने गर्भधारणेपूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याचा तंतोतंत पालन केल्यास उपजत व माता मृत्यूही कमी होऊ शकतात. त्यासोबतच प्रत्येक प्रसूती रुग्णालयात होणेही आवश्यक आहे.” – डॉ. अविनाश गावंडे, बालरोग तज्ज्ञ