डोक्यात विटा पडून ६५ वर्षीय सुरक्षा रक्षकाचा मृत्यू, दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

क्राईम

प्रतिनिधी

दहिसर पश्चिम येथे डोक्यात विटा पडून ६५ वर्षीय सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी इमारतीच्या नूतनीकरणाचे काम घेतलेल्या कंपनीच्या मुकादमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उद्वाहनातून विटा घेऊन जात असताना त्या सुरक्षा रक्षकाच्या डोक्यात पडल्या. पुढे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दहिसर येथे वास्तव्यास असलेले शरद आंब्रे (६५) याच परिसरातील एका इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून गेली पाच वर्षे काम करीत होते. तेथील नोकरी सुटल्यानंतर आंब्रे डायमंड इंडस्ट्रीयल इस्टेट प्रिमायसेस येथे गेल्या १५ दिवसांपासून काम करीत होते. आंब्रे यांनी मुलाला नोकली लावण्यासाठी सोमवारी इमारतीजवळ बोलावले होते. मुलगा तेथे पोहोचला असता त्याला डायमंड इंडस्ट्रीलय इस्टेट प्रिमायसेस कॉ. हाऊसिंग सोसायटी येथे गर्दी दिसली. जवळ जाऊन पाहिले असता त्याला शरद आंब्रे बेशुद्धावस्थेत पडल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या कान आणि नाकातून रक्त येत होते. नूतनीकरणासाठी उद्वाहनातून विटा घेऊन जात असताना त्या आंब्रे यांच्या डोक्यात पडल्या. त्यामुळे ते जखमी झाले. त्यानंतर मुलाने तत्काळ एस. व्ही. रोड येथील समर्पण रुग्णालयात वडिलांना उपचारासाठी दाखल केले.

सायंकाळी उपचारादरम्यान शरद आंब्रे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुलाच्या तक्रारीवरून नूतनीकरणाचे काम करणारा कंपनीचा मुकादम नसीम शेख यांच्याविरोधात दहिसर पोलिसांनी हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.