प्रतिनिधी
रात्री उशिरा दारू पिऊन घरी परत येताना दोन मित्रांमध्ये सुरू झालेला किरकोळ वाद विकोपाला गेला आणि त्यातून एकाने दुसऱ्या मित्राची चाकूने हत्या केली. एवढेच नव्हे तर हत्येनंतर त्याचा मृतदेह नाल्यात फेकून त्यावर दुचाकी ठेवली. ही घटना सोमवारच्या मध्यरात्री भंडारा शहराजवळील टाकळी येथे घडली.
आज सकाळी परिसरातील नागरिकांना नाल्यात दुचाकी दिसल्यानंतर ही घटना उघडकीस आली. कपील अशोक उजवणे (३१) असे मृताचे नाव असून ऋषभ संजय दोनोडे (२०) आणि करण दिलीप भेदे (२०) अशी हत्या करणाऱ्यांची नावे आहेत. मृत आणि आरोपी हे भगतसिंग वॉर्ड टाकळी येथील रहिवासी आहेत. भंडारा पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपींना अटक केली.
मृत कपील उजवणे आणि आरोपी ऋषभ व करण यांच्यात सोमवारी रात्री टाकळी येथे वाद झाला. भांडण विकोपाला गेल्याने ऋषभ आणि करण यांनी कपीलला टाकळी येथीलच निर्वाण मेटल कंपनीच्या मागील मैदानात नेले. तिथे कपीलच्या छातीवर, चेहऱ्यावर अनेकदा वार करुन ठार मारले. आरोपी एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने कपीलचा मृतदेह उचलून निर्वाण मेटल कंपनीच्या मागे असलेल्या सिमेंटच्या नाल्यात फेकला. त्यानंतर कपीलच्या मृतदेहावर दुचाकी ठेवली. दरम्यान आज सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास ही घटना समोर येताच परिसरात खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनाम्यानंतर मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. पोलिसांनी आरोपी ऋषभ दोनोडे आणि करण दिलीप भेदे यांच्यावर भादंविच्या कलम ३०२, २०१ ३४ अन्वये गुन्हा नोंदवून अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गोकुळ सूर्यवंशी करीत आहेत.