प्रधानमंत्री कुसुम-ब योजनेच्या लाभासाठी फसव्या संदेशापासून सावध राहण्याचे आवाहन*

Uncategorized

पुणे, दि. १४ : महाऊर्जामार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री कुसुम-ब योजनेच्या लाभासाठी बनावट संकेतस्थळावरून व संदेशाद्वारे महाकृषी ऊर्जा अभियान पीएम-कुसुम घटक-ब योजनेच्या नावाने शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी संदेशद्वारे (एसएमएस) लिंक पाठविली जात असून नागरिकांनी या खोट्या, फसव्या संकेतथळांना भेट देऊ नये तसेच कोणत्याही प्रकारचा पैसे भरणा करू नये, असे आवाहन महाऊर्जा कार्यालयाने केले आहे.

प्रधानमंत्री कुसुम-ब योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ३. ५ व ७.५ अश्वशक्ती क्षमतेचे पारेषण विरहित सौर कृषिपंप देण्यात येत असून याकरिता केंद्र व राज्य शासनामार्फत खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यास ९० टक्के आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यास ९५ टक्के अनुदान दिले जाते. सौर कृषिपंपासाठी पात्र लाभार्थ्यांना पंपाच्या क्षमतेनुसार खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यास १० टक्के आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यास ५ टक्के लाभार्थी हिस्सा भरण्यासाठीचा संदेश पाठविला जातो.

योजनेच्या अधिक माहितीसाठी, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (मेढा) च्या अधिकृत संकेतस्थळाला (www.mahaurja.com) भेट द्यावी किंवा ०२०-३५०००४५० या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे विभागीय महाव्यवस्थापक ए.व्ही.कुलकर्णी यांनी कळविले आहे.