अकरा वर्षीय मुलामुळे युवकाला जीवदान! हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

माझा जिल्हा

प्रतिनिधी

एका अकरा वर्षाच्या मेंदूमृत मुलामुळे सोळा वर्षाच्या मुलाला जीवदान मिळाले आहे. रस्त्यावरील अपघातात गंभीर जखमी होऊन मेंदूमृत झालेल्या मुलाचे हृदय दुसऱ्या मुलाला प्रत्यारोपित करण्यात आले. पिंपरीतील खासगी रुग्णालयात ही गुंतागुंतीची हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया नुकतीच यशस्वीपणे करण्यात आली.

गेल्या दोन वर्षांपासून १६ वर्षांचा अमित (नाव बदललेले) हृदय मिळविण्यासाठी धडपडत होता. त्याच्या हृदयाचे स्नायू कमकुवत झाल्याने हृदय निकामी झाले होते. एका रुग्णालयात रस्त्यावरील अपघातात गंभीर जखमी झालेल्या ११ वर्षांचा मुलाला मेंदूमृत घोषित करण्यात आले. त्याच्या पालकांनी अवयवदानाची परवानगी दिल्यानंतर विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीशी संपर्क साधण्यात आला. समितीच्या निर्देशानुसार पिंपरीतील डीपीयू सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या एका पथकाने त्या रुग्णालयात जाऊन हृदय आणले. केवळ चार तासांमध्ये हे हृदय प्रत्यारोपण करणे हे आव्हानात्मक काम होते.

रुग्णालयाच्या हृदयशल्य चिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. अनुराग गर्ग यांनी हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रियेचे नेतृत्व केले. रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी तीन तासांमध्ये प्रत्यारोपण पूर्ण केले. या प्रत्यारोपणामध्ये हृदयरोग विभागाचे डॉ. आशिष डोळस, डॉ. रणजित पवार, हृदयरोग भूलतज्ज्ञ डॉ. विपूल शर्मा, डॉ. शाहबाज हसनेन, हृदयरोग विभागाचे प्रमुख डॉ. एस. के. मलानी, तसेच क्रिटिकल केअर मेडिसीनचे डॉ. प्रशांत साखवळकर, डॉ. असीर तांबोळी यांच्या पथकाचा समावेश होता.

अवयवदात्याचे ह्रदय अमितचे शरीर स्वीकारते की नाही हे तपासण्यासाठी प्रत्यारोपणापूर्वीच डॉक्टरांनी त्याची रोगप्रतिकारशक्तीची तीव्रता कमी केली. तसेच प्रत्यारोपणानंतर हृदय व्यवस्थित कार्य करते की नाही हेही तपासून पाहण्यात आले. दात्याचे हृदय रुग्णाच्या शरीराने स्वीकारले आणि ते कार्यरतही झाले. प्रत्यारोपणानंतर तीन आठवड्यापर्यंत अमितला तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते.