भटका कुत्रा चावल्याने तरुणीचा मृत्यू; रेबीजविरोधी लस घेऊनही हे घडले कसे? पालकांची संतप्त विचारणा

माझा जिल्हा

प्रतिनिधी

भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने एका २१ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तिने कुत्र्याने चावा घेतल्यानंतर रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्णत: घेतले. तरीही काही तीन दिवसांनी तिचा रेबीजमुळे मृत्यू झाला. सृष्टी सुनील शिंदे (वय २१) असे या मृत तरुणीचे नाव आहे. ती पेशाने ग्राफिक डिझायनर होती.

कोल्हापूरमधील भाऊ सिंगजी रोडवरून सृष्टी ३ फेब्रुवारीला शनिवार पेठेत जात असताना एका फोन कॉलला उत्तर देण्यासाठी म्हणून ती थांबली. त्यावेळी एका भटक्या कुत्र्याने तिच्या पायाला जोरात चावा घेतला. गंभीररीत्या जखमी झालेल्या सृष्टीला उपचारांसाठी स्थानिकांनी तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले. तेथील उपचारानंतर ती घरी गेली. तिच्यावर वैद्यकीय नियमानुसार रेबीज प्रतिबंधक लसीद्वारे उपचारही झाले; ज्याचे तिने पाचही डोस घेतले. पण, काही दिवसांनी तिला ताप आला आणि दोन्ही पायांतील शक्ती गेली.

त्या प्रसंगी सृष्टीला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे अनेक चाचण्या करण्यात आल्या. पण, प्रकृती अधिकच बिघडल्याने तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. चाचणी अहवालात तिला रेबीजची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर पुढील उपचारासाठी सृष्टीला शासकीय रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचारादरम्यान दुसऱ्या दिवशी तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी महापालिका प्रशासन आरोग्य व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली आहे.

लसीचा कोर्स पूर्ण करूनही तिला रेबीज झाला कसा, असा प्रश्न सृष्टी शिंदेच्या मृत्यूमुळे निर्माण झाला आहे. लस आवश्यक तापमानात ठेवली नव्हती का, असाही प्रश्न तिचे कुटुंबीय विचारत आहेत.