उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची काटेकोर तपासणी करा-निवडणूक खर्च निरीक्षक विजयकुमार*

Uncategorized

प्रतिनिधी.

आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची काटेकोर तपासणी करताना विविध पथकांनी आपल्याकडील खर्चविषयक माहिती वेळेत खर्च समितीकडे सादर करावी, असे निर्देश निवडणूक खर्च निरीक्षक विजयकुमार यांनी दिले.

बारामती उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे आयोजित बारामती विधानसभा मतदारसंघातील निवडणूक खर्च व्यवस्थापन आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर, अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश शिंदे, उप विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, गटविकास अधिकारी अनिल बागल आदी उपस्थित होते.

श्री. कुमार म्हणाले, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय स्तरावर नियुक्त निवडणूक खर्च विषयक कक्षातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी विविध नमुन्यातील नोंदी तसेच उमेदवारांनी दिलेल्या खर्चाच्या माहितीच्या नोंदीची पडताळणी करावी. नोंदवह्या काटेकोरपणे अद्ययावत ठेवाव्यात. निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय, निष्पक्ष वातावरणात पार पाडण्याच्यादृष्टीने या बाबी महत्वाच्या आहेत, असेही ते म्हणाले.

निवडणूक खर्चाची नोंद योग्य पद्धतीने घेऊन प्रत्येक नोंदी अद्ययावत ठेवाव्यात. बँकांकडून प्राप्त झालेल्या तपशिलाची माहिती संकलित करावी. विविध भरारी पथके सातत्याने कार्यान्वित ठेवून प्रत्येक बाबींची बारकाईने तपासणी करावी. अधिकाऱ्यांनी स्थिर पथकाच्या ठिकाणी भेटी देऊन तेथील दैनंदिन आढावा घ्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

श्री. विजयकुमार यांनी आचारसंहिता कक्ष, निवडणूक व्यवस्थापन कक्ष, कायदा व सुव्यवस्था कक्ष, टपाली मतदान कक्ष, माध्यम कक्ष अशा विविध कक्षांच्या कामकाजाची माहिती घेतली.