प्रतिनिधी-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ नेते श्री मुलायम सिंह यादव यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. श्री यादव यांनी लोकांची तत्परतेने सेवा केली आणि लोकनायक जेपी आणि डॉ.लोहिया यांच्या आदर्शांचा जनतेत प्रसार करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले होते,असे पंतप्रधानांनी नमूद केले.श्री.यादव यांनी संरक्षण मंत्री असताना भारताला सामर्थ्यशाली बनविण्याचे कार्य केले. श्री यादव यांच्यासोबत असलेल्या आपल्या दृढ मैत्रीचे स्मरण करत पंतप्रधान म्हणाले की, यादव यांचे मत ऐकण्यासाठी मी नेहमीच उत्सुक असे. मुलायमसिंग यांच्याशी झालेल्या भेटींची छायाचित्रेही पंतप्रधानांनी सामायिक केली आहेत.श्री.मुलायमसिंग यादव यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
आपल्या ट्विटर संदेशांच्या मालिकेद्वारे पंतप्रधानांनी असे ट्विट केले आहे ;“श्री मुलायम सिंह यादवजी हे एक उल्लेखनीय व्यक्तिमत्व होते. लोकांच्या समस्यांबद्दल संवेदनशील असणारा एक नम्र आणि तळमळीचा नेता म्हणून त्यांची सर्वत्र प्रशंसा होत असे.त्यांनी अतिशय तत्परतेने लोकांची सेवा केली आणि लोकनायक जेपी आणि डॉ.लोहिया यांच्या आदर्शांना लोकप्रिय करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले.
मुलायम सिंह यादव यांनी उत्तर प्रदेश आणि राष्ट्रीय राजकारणात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते.आणीबाणीच्या काळात लढणारे लोकशाहीचे ते प्रमुख समर्थक होते. संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी भारताला सामर्थ्यशाली बनविण्यासाठी कार्य केले.त्यांचे संसदेतील कामकाज अभ्यासपूर्ण असे आणि त्यांनी नेहमीच राष्ट्रीय हित पुढे नेण्यावर भर दिला होता.“आम्ही आपापल्या राज्यांचे मुख्यमंत्री असताना मुलायमसिंह यादव यांच्याशी माझा अनेकवेळा संवाद झाला. त्यांच्याशी असलेले मैत्र पुढेही कायम राहिले, त्यांची मते ऐकण्यासाठी मी नेहमीच उत्सुक असे.त्यांच्या निधनाने मला तीव्र दुःख झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि लाखो समर्थकांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो.