प्रियकराने दगा दिल्यामुळे प्रशिक्षणार्थी महिला पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

क्राईम

प्रतिनिधी

प्रियकराने लग्नाचे वचन देऊन दुसऱ्याच तरुणीशी लग्न केल्यामुळे नैराश्यात गेलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण केंद्रात उघडकीस आली. प्रतीक्षा भोसले (२८, बारामती, पुणे) असे मृत महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे प्रशिक्षण केंद्रात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात जवळपास १२०० महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरु आहे. नुकताच क्रिकेटपटू कपील देवने प्रशिक्षण केंद्राला भेट देऊन महिला पोलिसांचे मनोबल उंचावले होते. कपील देवच्या भेटीमुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील वातावरणही प्रफुल्लीत झाले होते. केंद्रात पुणे-बारामती येथील प्रतीक्षा भोसले ही तरुणीसुद्धा प्रशिक्षण घेत होती. ती प्रशिक्षण केंद्रात दाखल झाल्यापासूनच एकाकी राहत होती. कौटुंबिक समस्या असल्याचे सांगून ती वेळ मारून नेत होती. सोमवारी रात्री सर्व जण झोपी गेल्यानंतर तिने वसतीगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी ती परेडला हजर न झाल्यामुळे मुलींनी तिच्या खोलीत डोकावून बघितले असता प्रतीक्षा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. त्यांनी लगेच वरिष्ठांना माहिती दिली. या प्रकरणी बजाजनगर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी पंचनामा केला आणि सूचनेवरून आकस्मिक मृत्यूची नोंद केली. प्रतीक्षाच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली. आईला मुलीच्या प्रेमप्रकरणाबाबत सर्व माहिती होती. पतीशी घटस्फोट झाल्यानंतर प्रतीक्षाने नव्याने जीवन जगण्याची सुरुवात केली होती. तिच्या प्रियकराने लग्नाची तयारी दर्शविली होती. त्यासाठी पोलीस प्रशिक्षण पूर्ण होताच लग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, प्रियकर दगाबाज निघाला. त्यामुळे प्रतीक्षाने आपली जीवनयात्रा संपविली, अशी माहिती सूत्रंनी दिली.

प्रतीक्षा आणि तिचा प्रियकर एकाच अकादमीत प्रशिक्षण घेण्यासाठी होते. दोघांची ओळख झाली आणि प्रेमात पडले. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. प्रतीक्षा विवाहित होती. तिने पतीशी घटस्फोट घेतला होता. प्रशिक्षण संपल्यानंतर ऑगस्टमध्ये दोघेही लग्न करणार होते. मात्र, प्रियकराने प्रतीक्षाला दगा देऊन एप्रिल महिन्यात नातेवाईक मुलीशी लग्न केले. त्यामुळे प्रतीक्षा नैराश्यात गेली. तेव्हापासूनच तिच्या मनात आत्महत्येचे विचार घोळत होते.

‘मुझे जीने का सलीखा ना सिखाओ, मेरे कुछ ख्वॉब अधुरे, वरना, जीना तो हम नवाबों से शरीफ जानते हैं.’ असा संदेश प्रतीक्षाने समाजमाध्यमावर काही दिवसांपूर्वीच टाकला होता. तिने आत्महत्या करण्यापूर्वी मनगटावर प्रियकराच्या नावाने मंगळसूत्र बांधले होते. ‘ मी मेल्यानंतर प्लीज कुणीही माझा फोटो स्टेटसला ठेवू नका. माझ्या आईला माहिती पडू देऊ नका.’ अशी विनंतीवजा चिठ्ठी प्रतीक्षाने आत्महत्येपूर्वी लिहिली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.