अपहरणनाट्य! ‘मुलगा सुखरुप पाहिजे असेल तर…’

क्राईम

प्रतिनिधी

एका विद्यार्थ्याचे अपहरण करून दोन लाख रुपये खंडणीची मागणी करणाऱ्या चार अपहरणकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. अपहृत मुलाची सुटका केली. ही घटना यशोधरानगर पोलीस ठाण्याअंतर्गत घडली. दीप गुरव (१७) असे अपहृत मुलाचे नाव आहे.

आकाश लोनारे (२२)रा. इंदिरामाता नगर, विनीत उर्फ प्रणय खोब्रागडे (२०) रा. एनआयटी गार्डन, धम्मदीपनगर, गौरव मिश्रा (२९) रा. पिवळीनदी आणि विक्की दिघोरीकर (२४) रा. वनदेवी झोपडपट्टी अशी अटकेतील अपहरणकर्त्यांची नावे आहेत.

एनआयटी गार्डन, यशोधरानगर येथील रहिवासी फिर्यादी कविता गुरव (३८) यांचा मुलगा दीप हा ११ व्या वर्गात शिकतो. शुक्रवारी रात्री तो नातेवाईकांकडे गेला होता. त्याच वेळी आरोपींनी त्याला फोन करून बहिणीला त्रास देत असल्याच्या कारणावरून त्याला बोलाविले. घरी जाताच दीपने मोबाईल ठेवला आणि आरोपींना भेटण्यासाठी एनआयटी गार्डन परिसरात गेला. आरोपींनी शिवीगाळ करीत त्याला बळजबरीने दुचाकीवर बसविले आणि यशोधरानगर परिसरातील एका घरी घेऊन गेले. त्याला दारू पाजली, चाकूचा धाक दाखविला.

दरम्यान आरोपीपैकी एकाने दीपच्या भ्रमणध्वनीवर साडेनऊ वाजता फोन केला. आई फोनवर बोलली असता ‘तुमच्या मुलाचे अपहरण झाले आहे. मुलगा सुखरुप पाहिजे असल्यास दोन लाख रुपयांची खंडणी द्यावी लागेल. कोणालाही सांगितल्यास तुमच्या मुलास ठार करेल’ अशी धमकीही दिली. घाबरलेल्या आईने संपूर्ण प्रकार पतीला सांगितला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता यशोधरानगर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी आरोपींचा मोबाईल ‘ट्रेसिंग’वर लावला. आरोपींचे ‘लोकेशन’ मिळविले. पोलिसांना पाहताच आरोपीने दीपला विटाभट्टी परिसरात सोडले. दरम्यान भयभीत झालेल्या दीपला त्याचा मामा दिसला. मामासोबत तो पोलीस ठाण्यात पोहोचला. तत्पूर्वी, पोलिसांनी घटनास्थळ गाठून चारही आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

चारही आरोपी मित्र आहेत. त्यापैकी प्रणय हा शिक्षण घेत आहे. एक भाजीचा व्यवसाय करतो तर दोन आरोपी खाजगी काम करतात. नेहमीच एनआयटी गार्डनमध्ये बसतात. १५ दिवसांपूर्वी सायंकाळी गार्डनमध्ये बसले असताना कमी वेळात अधिक पैसा कमविण्याची कल्पना त्यांना सूचली. काय करायचे म्हणून त्यांनी अपहरण करण्याची योजना आखली. यावर शिक्कामोर्तब केले. परंतू, अपहरण कोणाचे करायचे, असा प्रश्न त्यांच्या समोर होता.