अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Uncategorized

 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मार्फत सन २०२३-२४ या वित्तीय वर्षात इयत्ता १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने ६० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती देण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मांग, मातंग, मिनी-मादीग, मादीग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील विद्यार्थ्याना महामंडळाकडून जेष्ठता व गुण क्रमांकानुसार महामंडळाकडे प्राप्त झालेल्या अर्जापैकी प्रथम ३ ते ५ विद्यार्थ्यांना निधीच्या उपलब्धतेनुसार प्रोत्साहनपर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

या शिष्यवृत्तीसाठी सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, रेशन कार्ड, जातीचा दाखला, उत्पनाचा दाखला, आधार कार्ड, ३ पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, व पुढील वर्षात प्रवेश घेतल्याची पावती व शिष्यवर्ती मागणीचे अर्ज इत्यादी कागदपत्रे सादर करावीत.

इच्छुक विद्यार्थी, विद्यार्थीनींनी महामंडळाचे कार्यालय, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सर्व्हे नंबर १०३,१०४ मेंटल कॉर्नर, विश्रांतवाडी पोलीस ठाण्यासमोर, येरवडा, पुणे-६ (दूरध्वनी क्रमांक ०२०-२९७०३०५७) येथे २५ जुलै पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहिर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ जिल्हा कार्यालय पुणे यांनी केले आहे.