प्रतिनिधी
शहरात छुप्या पद्धतीने गुटख्याची अवैध वाहतूक आणि विक्री सुरू असल्याचे वारंवार उघड झाले असून पोलिसांनी भर वर्दळीचा असलेल्या चित्रकलाचार्य नारायणराव पूरम चौकात गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो पकडला. टेम्पोमध्ये सुगंधित तंबाखू, रजनीगंधा, विमल असा तब्बल १५ लाख ६५ हजारांचा साठा आढळून आला. वाहतूक पोलिसांनी टेम्पो अडविल्यानंतर त्याची तपासणी केली. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चालकाला अटक केली आहे.
कुदबुद्दीन अलीहुसेन दारूवाला (३८, रा. मिठानगर, कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत खडक वाहतूक विभागातील पोलीस कर्मचाऱ्याने फिर्याद दिली आहे. बाजीराव रस्ता आणि टिळक रस्ता यांना जोडणाऱ्या पूरम चौकामध्ये बुधवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. राज्यामध्ये गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि इतर पदार्थाच्या विक्री तसेच वापरास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. मात्र, गुटखाबंदी ही कागदावरच असल्याचे मागील काही कारवायांमधून अधोरेखित झाली आहे. शहरातील छोट्या मोठ्या पानटपऱ्यांवर सहजगत्या गुटखा उपलब्ध होतो. दरम्यान, बुधवारी दुपारी खडक वाहतूक विभागातील कर्मचारी पूरम चौकात थांबलेले होते. त्यावेळी तेथून जाणाऱ्या एका टेम्पोला त्यांनी अडविले. संशय आल्याने त्यांनी टेम्पोची तपासणी केली तेव्हा आतमध्ये गुटख्याचा साठा आढळून आला. त्यानुसार स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेला व्यक्ती चालक म्हणून काम करतो. त्याने हा गुटखा कुणाच्या सांगण्यावरून तसेच कोठे घेवून जात होता, याबाबत स्वारगेट पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, स्वारगेट परिसरात यापुर्वी देखील गुटखा कारवाया करण्यात आलेल्या आहेत. याठिकाणी स्वारगेट पोलीस ठाणे, गुन्हे शाखा युनिट दोनचे कार्यालय आहे. या पथकातील कर्मचाऱ्यांची हद्दीत गस्त असते. तरीदेखील गुटखा विक्री सुरूच असल्याचे समोर येत आहे.
काही दिवसांपूर्वीच पुणे ग्रामीण पोलिसांनी खेड शिवापूर टोलनाका परिसरात तब्बल १ कोटी १५ लाख ८८ हजारांचा गुटखा जप्त केला. एका टेम्पोतून हा गुटखा कर्नाटक येथून पुण्यामध्ये येत होता. त्यानंतर आता स्वारगेट भागात ही कारवाई करण्यात आली आहे