सोनगाव येथील कऱ्हा नदीवर पादचारी पूलाचा आराखडा करा- उपमुख्यमंत्री अजित पवार

Uncategorized

बारामती, दि.२: सोनगाव येथील सोनेश्वर मंदिर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकरिता कऱ्हा नदीवर पादचारी पूलाचे बांधकाम करण्याच्यादृष्टीने आराखडा तयार करा, सोनगाव येथे शनिवारी (दि.१) प्रस्तावित नवीन पूल आणि दशक्रिया घाटाच्या पाहणीवेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी निर्देश दिले.

यावेळी उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहीर, महावितरणचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, तहसीलदार गणेश शिंदे, उप अभियंता सुभाष पाटील आदी उपस्थित होते.

श्री. पवार यांनी बोटीने परिसराची पाहणी
करून ते म्हणाले, सोनगाव येथील सोनेश्वर मंदिर हे कऱ्हा आणि नीरा नदीच्या संगमावर वसलेले असून येथे महाशिवरात्री दिवशी मोठी यात्रा भरते. संगमावर १२ महिने मोठ्या प्रमाणामध्ये पाणी असते. यामुळे भाविकांना दर्शन घेण्यासाठी पाच किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. यामुळे भाविकांनी या ठिकाणी पूल व्हावा, केलेली होती.

भाविकांच्या मागणीनुसार कऱ्हा नदीवरील मंदिर ते सोनगावच्या बाजूने येण्यासाठी नवीन पादचारी पुल तसेच सोनेश्वर मंदीर परिसर सुधारणा आणि दशक्रिया विधी घाटाचे बांधकाम असा एकत्रित आराखडा तयार करा.

नवीन पुलामुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होणार नाही, नागरिकांच्या शेतीत पाणी जाणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. सद्यस्थितीत असलेल्या घाटावरील पायऱ्याची दुरुस्ती करुन घ्यावी. आवश्यकतेनुसार नवीन दगड वापरुन त्यावरुन बाजरी घडई करावी, अशा सूचना श्री. पवार यांनी दिल्या.