प्रतिनिधी –
महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या सायबर सुरक्षा जनजागृती 2025 उपक्रमांतर्गत वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण यांच्यावतीने 01 ऑक्टोंबर ते 31 ऑक्टोंबर 2025 या महिन्यात स्वातंत्र्य विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय वडगाव निंबाळकर, M.S. काकडे कॉलेज येथे, सोमेश्वर हायस्कूल, वाघळवाडी, करंजे पूल बस स्टॅन्ड, बाजारातील गर्दीचे ठिकाण इत्यादी ठिकाणी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या वतीने उपस्थित विद्यार्थी, शिक्षक व इतर नागरिक यांना खालील प्रमाणे सायबर सुरक्षेच्या अनुषंगाने मार्गदर्शन करून जनजागृती केली. आधुनिक युगात इंटरनेट, मोबाईल आणि डिजिटल सेवांचा वापर आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. मात्र याच तंत्रज्ञानाचा गैरवापर करून विविध सायबर गुन्ह्यांची संख्या वाढताना दिसत आहे.
ऑनलाईन फसवणूक, बँकिंग फ्रॉड, सोशल मीडिया हॅकिंग, फेक लिंक, OTP आणि KYC अपडेटच्या नावाखाली पैसे लुटणे, बनावट नोकरीच्या जाहिराती, तसेच महिलांवर होणारे सायबर अत्याचार ही गंभीर समस्यांना तोंड देताना डिजिटल व्यवहार सुरक्षित ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
खालील काही महत्वाच्या गोष्टी सदैव लक्षात ठेवाव्यात:
1. कोणालाही OTP, पासवर्ड, ATM PIN किंवा बँक तपशील देऊ नका
2. संशयास्पद लिंक किंवा अॅप डाउनलोड करू नका
3. KYC अपडेट, लकी ड्रॉ किंवा कस्टमर केअरच्या नावाने येणाऱ्या कॉल्सवर विश्वास ठेवू नका
4. सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती शेअर करताना काळजी घ्या
5. मुलांना सुरक्षित इंटरनेट वापराचे प्रशिक्षण द्या
काहीही सायबर फसवणूक झाल्यास त्वरित www.cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदवावी.
*हेल्पलाइन नंबर 1930*
विशेषत: डिजिटल आर्थिक फसवणुकीसाठी (उदा. UPI स्कॅम, बँकिंग ट्रान्झॅक्शन फसवणूक इत्यादी).
उदाहरणार्थ, जर अचानक अज्ञात व्यक्तीकडून आपले पैसे हस्तांतरित झाले असतील किंवा ऑनलाइन पेमेंट अॅपमध्ये फसवणूक झालेली असेल, तर 1930 वर त्वरित संपर्क करावा.
*हेल्पलाइन नंबर 1945*
विशेषतः Maharashtra Cyber (महाराष्ट्र राज्य) यांच्याद्वारे सायबर गुन्ह्यांसाठी आहे .
उदाहरणार्थ, जर तुम्ही महाराष्ट्रात असाल आणि सायबर गुन्हा (उदा. ऑनलाइन धमकी, सोशल मीडियावर होणारी फसवणूक, मोबाइल अॅप स्कॅम) लक्षात आला असेल, तर 1945 वर संपर्क करू शकता.
याबाबत माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण पोलीस दलांतर्गत वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन यांच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे, पोलीस हवालदार पोपट नाळे, अमोल भोसले, पोलीस अंमलदार विलास ओमासे यांनी मार्गदर्शन व जनजागृती केली.