प्रतिनिधी
नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी तपोवन आणि इतर परिसरातील तब्बल १७०० हून अधिक झाडांची कत्तल करण्याचा प्रस्ताव आहे. विकासासाठी पायाभूत सुविधा आवश्यक आहेत यात दुमत नाही, पण ज्या तीव्रतेने हा वृक्षतोडीचा घाट घातला जात आहे, त्याने पर्यावरणासाठी काम करणाऱ्या आणि ‘जीवदया’ जपणाऱ्या समाजातील काही विशिष्ट गटांचे मौन अधिक गंभीर वाटते.
जेव्हा भटक्या कुत्र्यांवर नसबंदी करण्याचे किंवा त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रशासनाने आदेश दिले, तेव्हा अनेक ठिकाणी प्राणीप्रेमींनी आणि ‘डॉग लव्हर्स’नी मोठे आंदोलन उभे केले. या प्राण्यांच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरून जागोजागी आवाज उठवण्यात आला.
भारतीय संस्कृती आणि परंपरेनुसार, गायीला ‘माता’ मानले जाते, यात शंका नाही. गौहत्या होणे हे क्रूरतेचे लक्षण आहे आणि ते थांबवणे पूर्णपणे आवश्यक आहे. गौहत्येच्या विरोधात ‘गोरक्षक’ आणि संबंधित संघटनांचा आवाज नेहमीच तीव्र आणि अत्यंत स्पष्ट असतो. हा संघर्ष जीव वाचवण्यासाठी आणि क्रूरता थांबवण्यासाठीचा आहे.
झाड हे केवळ लाकूड नाही. ते एक सजीव अस्तित्व आहे; शेकडो पक्षी, कीटक आणि लहान वन्यजीवांचा ते नैसर्गिक अधिवास आहे. एका रात्रीत १७०० हून अधिक झाडे तोडणे म्हणजे हजारो जीवांना निर्वासित करणे आणि पर्यावरणाचे आयुष्य संपवणे होते. वृक्षतोड करणे हे हत्या करने इतकेच क्रूर कृत्य आहे, मग या क्रूरतेविरोधात आवाज का उठत नाही?
मंदिराचा प्रश्न असो किंवा मशिदीचा, धार्मिक लोक आपल्या श्रद्धेसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करतात. वृक्षतोड या पर्यावरणाच्या क्रूर कृत्यासाठी हे सर्व रस्त्यावर का उतरत नाहीत?
सर्व धर्मियांनी, सर्व सामाजिक संघटनांनी, सर्व स्वयंसेवी संस्थांनी (NGOs), आणि सर्व पत्रकार बांधवांनी या गंभीर प्रश्नाचा विचार करावा. जीवदयेची ही संकल्पना फक्त आपल्या आवडीच्या प्राण्यांपुरती मर्यादित न ठेवता, ती वृक्षांच्या जीवनापर्यंत वाढवणे आज काळाची गरज आहे.
ज्या वेळी अनेक जण शांत आहेत, अशा वेळी ज्यांनी या कत्तलीविरोधात आवाज उठवला, धन्य ते सयाजी शिंदे आणि त्यांचे कार्यकर्ते! पर्यावरणाप्रती त्यांचे हे कार्य प्रेरणादायी असून, त्यांना शत् शत् प्रणाम!
या मौनावर आणि विसंगतीवर आपण विचार करणे आवश्यक आहे.

















