प्रतिनिधी.
खराडी, पुणे, २३ नोव्हेंबर २०२६: संत निरंकारी मिशनच्या सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता रमित जी यांच्या पावन आशीर्वादाने पुणे झोनचा महिला संत समागम रविवार, २२ नोव्हेंबर रोजी महालक्ष्मी लॉन्स, खराडी येथे उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत आयोजित या समागमात पुणे झोनमधील विविध शाखांतील ५,००० हून अधिक महिला भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
समागमात सादर करण्यात आलेल्या विचार, भक्तिगीते आणि लघुनाटिकांमधून नारी शक्तीचे महत्त्व, कौटुंबिक जीवनातील तिची भूमिका, ब्रह्मज्ञानाची आवश्यकता तसेच प्रेम, सद्भावना आणि मानव एकतेचा संदेश देण्यात आला.
या प्रसंगी मुख्य वक्त्या डॉ. प्रवीण खुल्लर जी यांनी सांगितले की, सत्गुरू आणि निरंकार प्रभूशी दृढ विश्वास, कृतज्ञता आणि समर्पणाच्या भावनेने जोडलेले राहिल्याने जीवन सहज, शांत आणि आनंदमय बनते.
नारी शक्तीचे महत्त्व स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, नारी आई, मुलगी, बहीण, पत्नी आणि सून अशा विविध नात्यांची जबाबदारी प्रेमाने पार पाडते. ती केवळ कुटुंबाचा आधार नसून पुढील पिढीवर संस्कार घडविणारी प्रथम शिक्षिका आहे. मुलांच्या मनात जात, धर्म, भाषा किंवा आर्थिक परिस्थितीचा भेदभाव न करता सर्वांप्रती प्रेम आणि समानतेची भावना रुजविणे आवश्यक आहे.
मानव एकतेचा विचार मांडताना त्यांनी सांगितले की, ब्रह्मज्ञानामुळे संपूर्ण मानवता एकाच परमपिता परमात्म्याची संतान असल्याची जाणीव होते. प्रत्येक व्यक्तीमध्ये निरंकाराचे अस्तित्व पाहण्याची दृष्टी निर्माण झाल्याने प्रेम, सद्भावना आणि परस्पर आदराची भावना दृढ होते.
अध्यात्म म्हणजे केवळ कर्मकांड नसून स्वतःच्या वास्तविक स्वरूपाची ओळख करून घेणे होय. सत्गुरूंच्या कृपेने प्राप्त ब्रह्मज्ञान मनातील अहंकार दूर करून विनम्रता, समर्पण आणि कृतज्ञतेची भावना जागृत करते. निरंकार प्रभू आपल्या सदैव अंगसंग असल्याची अनुभूती आल्याने जीवनातील भय आणि चिंता दूर होऊन कौटुंबिक जीवन आनंदमय बनते.
शेवटी सर्व भाविकांना आवाहन करण्यात आले की, मानव जीवनाची अनमोल संधी सार्थक करून परमात्म्याची ओळख प्राप्त करावी आणि आपले जीवन प्रेम, सेवा, समर्पण व मानव एकतेच्या भावनेने सुंदर बनवावे.
