प्रतिनिधी
पिटबुल जातीच्या कुत्र्यांनी अचानक हल्ला केल्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, आता अशीच एक थरारक घटना पुण्यातील हडपसरमधून समोर आली आहे. सोसायटीच्या आवारात सायकल चालवत असलेल्या अवघ्या ११ वर्षांच्या एका चिमुकल्यावर पिटबुल जातीच्या श्वानाने अचानक झडप घालून जीवघेणा चावा घेतल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पुन्हा एकदा लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.ही घटना ३ नोव्हेंबर रोजी दुपारी बाराच्या सुमारास हडपसरमधील अमर कोर्टयार्ड सोसायटीत घडली.
यावेळी हेमंत दामोदर गाढवे यांचा ११ वर्षांचा मुलगा समरजित हा सोसायटीच्या मागील बाजूला असलेल्या उद्यानात सायकल घेऊन जात होता. त्याच वेळी सोसायटीच्या बेसमेंटमधून कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला, ज्यामुळे तो सायकलसह बाजूला थांबला. मात्र, काही क्षणातच पिटबुल जातीच्या एका कुत्र्याने अचानक त्याच्यावर झडप घालून छातीला चावा घेतला.
अचानक घडलेल्या या घटनेने मुलगा प्रचंड घाबरला आणि जखमी झाला. त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.याप्रकरणी पाळीव कुत्र्याला सुरक्षितपणे बांधून न ठेवल्यामुळे आणि आवश्यक खबरदारी न घेतल्यामुळे कुत्र्याच्या मालक मिनल महावीर माने (रा. अमर कोर्टयार्ड, हडपसर) यांच्याविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होईल, असे कृत्य केल्याचा ठपका ठेवून ही कारवाई करण्यात आली आहे.
